Advertisement

धक्कादायक... बड्या औषध कंपन्यांकडून विनापरवानगी औषधांची निर्मिती?


धक्कादायक... बड्या औषध कंपन्यांकडून विनापरवानगी औषधांची निर्मिती?
SHARES

नॅशनल फार्मासिटीकल प्रायझिंग अॅथॉरिटी (एनपीपीए) ने अनेक औषधांच्या किंमती नियंत्रणात आणल्याने धाबे दणाणलेल्या बड्या-बड्या कंपन्यांनी आता चलाखी करत बेकायदेशीर नव्या औषधांची निर्मिती सुरू केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एनपीपीएची परवानगी न घेता औषध कंपन्यांकडून औषधांच्या घटकांमध्ये बदल करत नवीन औषधे बाजारात आणून विकली जात असल्याची ही धक्कादायक बाब आहे. अॅबॉट, डॉ. रेड्डीज, जीएसके, रॅनबॅक्सी अशा बड्या कंपन्यांसह 60 कंपन्यांनी विनापरवाना, बेकायदा औषध निर्मिती केली असून या कंपन्यांना आता एनपीपीएने चांगलाच दणका दिला आहे. या 60 ही कंपन्यांना एनपीपीएने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून 15 जूनपर्यंत कंपन्यांनी या नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही एनपीपीएने दिला आहे.

एनपीपीएची या कंपन्यांवर नेहमीच करडी नजर असते. त्यानुसार एनपीपीएच्या तपासणीमध्ये किंमती नियंत्रित करण्यात आलेल्या औषधांनाच नव्या ब्रँडमध्ये, नव्या नावाने बाजारात आणण्यात आल्याचे समोर आले आहे. औषधांच्या किंमती नियंत्रित केल्याने कंपन्या ज्या भरमसाठ नफा कमावत होत्या, तो नफा कमी झाल्याने औषध कंपन्यांनी चालाखी करत औषधांच्या घटकात बदल करत, कॉम्बिनेशनमध्ये बदल करत नव्या नवाने नवीन औषधे तयार केली, इतकीच नव्हे तर ती बाजारात आणून त्यांची विक्रीही सुरू केली. महत्त्वाचे म्हणजे यासाठी एनपीपीएसह संबंधित कोणत्याही यंत्रणांची परवानगी घेतली नाही. तब्बल 201 अशी विना परवाना तयार करण्यात आलेली औषधे असून बड्या-बड्या 60 कंपन्यांनी हा प्रताप केला आहे. 

या कंपन्या एनपीपीएच्या रडारवर असून या कंपन्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत एनपीपीएने दिले आहे. एनपीपीएच्या नोटिशीनुसार या कंपन्यांनी एनपीपीएची परवानगी तर घेतलेलीच नाही पण केंद्रीय औषध नियंत्रक विभागाची परवानगी तरी घेतली आहे का? याबाबतही साशंकता व्यक्त केली आहे. त्यामुळे ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात असून औषध कंपन्यांचा मनमानी आणि बेकायदा कारभाराचा हा उत्तम नमुना यानिमित्ताने समोर आला आहे. दरम्यान 15 जुनपर्यंत या कंपन्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्याविरोधात नियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही एनपीपीएने नोटिशीत नमूद केले आहे. त्यामुळे आता 15 जूननंतर काय होते हेच पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

रुग्णांच्या जीवाशी खेळ
विना परवाना ही औषध तयार करून बाजारात आणत विकली जात आहेत. त्यामुळे या औषधांच्या गुणवत्ता, दर्जाची खात्री देता येत नसल्याने अशी औषधे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात, अशी माहिती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिली जाता आहे. एनपीपीएची ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी कारवाई असून बड्या कंपन्याना हा दणका असल्याचेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आता रुग्णांच्या जिवाशी चाललेला खेळ रोखण्यासाठी या कंपन्यांविरोधात एनपीपीएने कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी तज्ज्ञांकडून होत आहे.

हे देखील वाचा - महाग स्टेण्टप्रकरणी एनपीपीएकडे रूग्णालयांबद्दल तक्रारी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा