Advertisement

समस्या घेऊन भाजपा खासदार नगरसेवकांसह महापौर चरणी

ईशान्य मुंबईतील भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष मनोज कोटक यांच्यासह या भागातील १४ नगरसेवकांसह महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याबरोबर बैठक घेऊन या भागातील ११ प्रमुख समस्यांबाबत पाढा वाचला.

समस्या घेऊन भाजपा खासदार नगरसेवकांसह महापौर चरणी
SHARES

भाजपाच्या ईशान्य मुंबईतील सर्व नगरसेवकांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या भागातील समस्यांचा पाढा वाचला. त्यानंतर याच भागातील सर्व नगरसेवकांनी खासदार किरीट सोमय्या यांच्यासमवेत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी चर्चा करून विविध समस्यांबाबत प्रशासनाचं लक्ष वेधलं.


याअाधी प्रशासनाकडे मागण्या

या नगरसेवकांच्यावतीनं खासदार किरीट सोमय्या यांनी या समस्या यापूर्वी आयुक्तांकडेही मांडल्या होत्या. परंतु तिथं काहीच हालचाल न झाल्यानं भाजपाच्या या खासदारानं थेट महापौरांच्या चरणी धाव घेतली. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वीची भाजपाची ही वेगळी खेळी आहे की काय असा चर्चा रंगली अाहे.


महापौरांवर विश्वास

ईशान्य मुंबईतील भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष मनोज कोटक यांच्यासह या भागातील १४ नगरसेवकांसह  महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याबरोबर बैठक घेऊन या भागातील ११ प्रमुख समस्यांबाबत पाढा वाचला. एका बाजूला महापौरांना कोणताही अधिकार नाही, त्यांना अधिकार मिळावा अशी खंत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केल्यानंतर याच महापौरांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या नगरसेवकांची बैठक बोलावून महापौरांवरच आपला विश्वास असल्याचं भाजपानं दाखवून दिलंय. आजवर भाजपाच्या खासदारांनी नगरसेवकांसह महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याबरोबर बैठका घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या होत्या. परंतु प्रथमच सोमय्या यांनी महापौरांची भेट घेऊन आपल्या विभागातील नगरसेवकांच्या समस्या मांडल्याने यात राजकारण दडलंय का असा प्रश्न पडला अाहे.


मुलुंड डम्पिंग बंद करा

या बैठकीमध्ये मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद करून येथील कचऱ्याची विल्हेवाट लावून विकास प्रकल्पाची सुरुवात २ ऑक्टोबरपासून करण्यात यावी अशी मागणी प्रामुख्यानं केली अाहे. मुलुंड, भांडुप व कांजूरमार्ग येथील मिठागरावरील जमिनीवर शौचालये व इतर सुविधा पुरवण्यासह नाहूर, विक्रोळी व विद्याविहार या तीन ठिकाणच्या रेल्वे पुलांच्या बांधणीचं काम जलदगतीनं करण्याची मागणी केली. याबरोबरच मुलुंड, भांडुप व कांजूरमार्ग या तीन ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्यासाठी आर्थिक निधीची तरतूद करण्याची मागणीही करण्यात अाली अाहे.


फेरीवाल्यांवर कारवाई करा

मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकाबाहेरील भागांमध्ये फेरीवाल्यांना बसण्यास बंदी आहे. त्यानुसार महापालिकेच्यावतीनं कारवाई करण्यात येत असली तरी पुन्हा एकदा सर्व रेल्वे स्थानकांच्या परिसरांमध्ये अनधिकृत फेरीवाले दिसून येत आहे. त्यामुळे या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील वीज निर्मिती प्रकल्पाला चालना देणं आणि भांडुप पश्चिम येथील रुणवाल ग्रीन प्रकल्पाच्या जवळील महापालिकेच्या जमिनीवरील नवीन रुग्णालयाला चालना देण्याचीही मागणी केली.


भाजपाचा छुपा अजेंडा?

विशेष म्हणजे या सर्व मागण्या प्रशासनाकडे यापूर्वीच भाजपानं केल्या होत्या. परंतु तिथं कोणतीही डाळ न शिजल्यानं महापौरांकडे बैठक घेऊन याच मागण्या भाजपानं मांडल्या आहेत. त्यामुळे या मागण्यांचा विचार न झाल्यास याचं खापर महापौरांच्या नावानं सत्ताधारी पक्षाच्या डोक्यावर येत्या निवडणुकीत फोडण्याचा भाजपाचा छुपा अजेंडा तर नाही ना अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.



हेही वाचा- 

ठाण्यातील झाडांना बसवलंय लोखंडी कवच!

डाव्या विचारवंतांच्या अटकेचा निषेध; डाव्या, पुरोगामी संघटनांचा मोर्चा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा