Advertisement

काळ्या यादीतील कंत्राटदाराचा प्रताप उघड


काळ्या यादीतील कंत्राटदाराचा प्रताप उघड
SHARES

नालेसफाई कंत्राट कामांमधील भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर 32 कंत्राट कामांमधील 23 कंत्राट कंपन्यांना काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे काळ्या यादीतील कंत्राटदारांना पुढील पाच वर्षे कोणत्याही कंत्राटात सहभागी होता येणार नाही. असे असतानाच काळ्या यादीतील एका कंपनीने चक्क नाव बदलून नालेसफाईचे कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान कंत्राटदाराचा प्रताप लक्षात येताच या कंत्राटदाराला बाहेरचा रस्ता दाखवण्यात महापालिका प्रशासन यशस्वी ठरत असले तरी कंत्राटदारांकडून अन्य कंपन्यांच्या नावाने काम मिळवण्याचा प्रयत्न सुरुच असल्याची बाब समोर आली आहे. 

सन 2017-18 या वर्षांकरिता मध्यवर्ती यंत्रणेमार्फत एच/पूर्व विभागातील मिठी नदीतील चेनेज 1280 मीटरपासून चेनेजर 3500 मीटर म्हणजेच धारावी पुलापासून प्रेमनगर आऊटफॉलपर्यंत गाळ काढण्यासाठी महापालिकेने मागवलेल्या निविदांमध्ये व्ही-टेक इंजिनियर्स, एस.एन.बी.इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, एम. बी.ब्रदर्स, अनास इन्फ्रा या कंत्राट कंपन्यांनी भाग घेतला होता. यामध्ये सर्वात कमी बोली अर्थात अंदाजित खर्चापेक्षा 13.50 टक्के कमी दराने बोली लावणारी व्ही-टेक इंजिनिअर्स ही कंपनी पात्र ठरली होती. परंतु व्ही-टेक इंजिनियर्स कंपनीचे अधिकृत स्वाक्षरीकार हे विजय वाघानी हे आहेत. महापालिकेने पहिल्या टप्यात ज्या तीन कंपन्यांना काळ्या यादीत टाकले होते, त्यातील नरेश ट्रेडर्स या कंपनीचेही अधिकृत स्वाक्षरीकार हे विजय वाघानी हेच आहे. 

ही बाब लक्षात येताच महापालिका प्रशासनाने विधी विभागाचे अभिप्राय जाणून घेतले. यामध्ये व्ही-टेक इंजिनिअर्स या कंपनीचे अधिकृत स्वाक्षरीकार विजय वाघानी हे काळ्या यादीत टाकण्यात आलेलया नरेश ट्रेडर्स या कंपनीचेही अधिकृत स्वाक्षरीकार असल्यामुळे तेही तांत्रिकदृष्टया काळ्या यादीत समाविष्ठ होतात. ते पुढील 5 वर्षे महापलिकेच्या कोणत्याही निविदा प्रक्रियामध्ये सामिल होऊ शकत नाही,असे विधी विभागाचे अभिप्राय मिळाल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरील एस.एन.बी.इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पात्र ठरवून हे कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन्ही कंपन्यांचे संगनमत?

व्ही-टेक इंजिनियर्स आणि एस.एन.बी.इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी अंदाजित खर्चापेक्षा 13.50 टक्के कमी दराने बोली लावून कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही कंपन्यांनी समान बोली लावून 3 कोटी 86 लाख 16 हजार कोटींचे कंत्राट मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु व्ही-टेक ही कपंनी काळ्या यादीतील नरेश ट्रेडर्स या कंपनीची सहयोगी कंपनी असल्याने बाद झाली. त्यामुळे एस.एन.बी. ही कंपनी पात्र ठरली असली तरी दोन्ही कंपन्यांनी लावलेली बोली ही निश्चितच दोघांमधील संगनमताचा भाग असल्याचे दाट शक्यता येत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा