Advertisement

मेट्रोच्या कामात समन्वय राखणार महापालिकेचं पथक


मेट्रोच्या कामात समन्वय राखणार महापालिकेचं पथक
SHARES

मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार सुरु असून यामुळे अनेक भागांमध्ये पाणी पुरवठ्याची तीव्र समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिका उपायुक्त (विशेष) यांच्या नेतृत्वाखाली या कामांत समन्वय राखण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे.


७५ टक्के पाणीपुरवठा बंद

जलवाहिनींवरील झडपा बदलण्याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आले असता, शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी अशाप्रकारची कामे करताना अन्य भागांमधील पाण्याचे पुरवठ्याचे वेळापत्रकच बिघडवले जात असल्याचा आरोप केला. तसेच अशा कामांमुळे कमी दाबाने पाण्याचा पुरवठा केला जातो. शीव प्रतिक्षा नगर येथे मागील अनेक दिवसांपासून अशाचप्रकारच्या झडपा बसवण्याच्या नावाखाली पाणी येत नसल्याची तक्रार सातमकर यांनी केली. या भागातील ७५ टक्के पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे अशाप्रकारची कामे हाती घेताना दुसऱ्या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती सातमकर यांनी केली.


दुरुस्तीस ७२ तासांपेक्षा जास्त वेळ

भाजपाचे नगरसेवक विद्यार्थी सिंह यांनी मेट्रोच्या कामामुळे बोरीवलीत जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडले असून ही जलवाहिनी दुरुस्ती करायला ७२ तासांपेक्षा अधिक वेळ लागला. त्यामुळे तीन प्रभागांमध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. परंतु येथील आर-मध्य प्रभागांमध्ये केवळ एकच टँकर उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना खासगी टँकरमधून पैसे मोजून पैसे देण्याची वेळ आली असल्याची खंत सिंह यांनी व्यक्त केली.


तीन ठिकाणी घटना

शीव प्रतीक्षानगर येथील अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत जलअभियंता यांना सूचना करून ही समस्या युद्धपातळीवर सोडवण्याचे आदेश दिले जातील, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिले. तसेच एका बाजूला काम हाती घेतल्यानंतर दुसऱ्या ठिकाणावरील पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी यापुढे घेतली जाईल, असेही आश्वासन मुखर्जी यांनी स्थायी समितीला दिले.

मेट्रोच्या कामांमुळे दोन ते तीन ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे काही प्रमाणात अडचण निर्माण झाली होती. परंतु मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी महापालिका समन्वय राखून आहेत. त्यासाठी उपायुक्त (विशेष) यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करून त्यामार्फत समन्वय राखला जात असल्याचे मुखर्जी यांनी सांगितले.



हेही वाचा -

'असा' आहे ठाणे-कल्याण-भिवंडीचा सुपरफास्ट मेट्रो मार्ग

सिद्धार्थ काॅलेजला ‘मेट्रो’दुखी, भिंती-पिलरला तडे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा