Advertisement

कुपरेज उद्यान दुर्घटना: आबासाहेब जऱ्हाड करणार चौकशी


कुपरेज उद्यान दुर्घटना: आबासाहेब जऱ्हाड करणार चौकशी
SHARES

कुपरेज उद्यानात घोड्यावरून पडून बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर उद्यानात अनधिकृत सुरु असलेल्या घोड्यांच्या रपेटबाबत महापालिकेच्यावतीने अखेर चौकशी समिती नेमण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब जऱ्हाड यांनी याप्रकरणाची चौकशी करून पुढील १५ दिवसांमध्ये आपला अहवाल देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहे.


संबंधित घोडे मालकांना अटक

कुपरेज उद्यानात घोड्याची रपेट करत असताना सहा वर्षीय मुलीचा पडून मृत्यू झाल्यानंतर याप्रकरणी संबंधित घोडे मालकांना पोलिसांनी अटक केली आहे. तर उच्च न्यायालयाने घोडे आणि घोडागाडींना बंदी घातलेली असतानाही याठिकाणी घोड्याची रपेट कशी सुरू होती, याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.


दोषी कोण?

मात्र, कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी याबाबतचा लेखी अहवाल महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना शुक्रवारी सादर केला. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अजोय मेहता यांनी दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब जऱ्हाड यांच्यावर चौकशी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. जऱ्हाड समितीला आपला अहवाल पुढील १५ दिवसांमध्ये सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे उद्यानात सुरू असलेल्या घोड्याच्या रपेटबाबत आता चौकशी केली जाणार असून यात दोषी कोण हे लवकरच समोर येणार आहे.



हेही वाचा - 

कुपरेज गार्डन प्रकरण: उद्यान विभागाचे अधिकारी अडचणीत?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा