Advertisement

कुपरेज गार्डन प्रकरण: उद्यान विभागाचे अधिकारी अडचणीत?

कुपरेज उद्यानात घोड्यांना बंदी असतानाही २१ घोडयांचा ताफा बच्चेकंपनीला फिरवण्यासाठी सज्ज असायचा.

कुपरेज गार्डन प्रकरण: उद्यान विभागाचे अधिकारी अडचणीत?
SHARES

कुपरेज उद्यानात घोड्यावरुन फेरफटका मारताना ६ वर्षांच्या मुलीचा पडून मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहे. कुपरेज गार्डनची ओळख घोड्यांचं गार्डन अशी आहे. २०१५ नंतर या उद्यानात घोड्यांना बंदी असतानाही २१ घोडयांचा ताफा बच्चेकंपनीला फिरवण्यासाठी सज्ज असायचा. घोड्यांची ही सेवा सुरु ठेवण्यासंदर्भात कायदेशीर मत मागवतानाच उद्यान विभागाने हे गार्डन बंद करण्याचे आदेश दिले नाहीत आणि न्यायालयाच्या आदेशाची प्रत चिकटवल्यानंतरही त्याठिकाणी कंत्राटदाराने घोड्यांचा प्रवेश रोखला नाही. त्यामुळे याप्रकरणी उद्यान विभागाचे उपअधिक्षकांसह संबंधित देखभाल करणारा कंत्राटदारही अडकण्याची शक्यता आहे.


कारणे दाखवा नोटीस

मुलीच्या मृत्यूनंतर महापालिकेच्या 'ए' विभाग कार्यालयाने संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावून न्यायालयाच्या बंदी आदेशानंतरही उद्यानात घोड्यांना प्रवेश कसा दिला? या संदर्भात स्पष्टीकरण मागितलं आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत उद्यानाबाहेर चिकटवून घोड्यांना बंदी घातल्याची सूचना देण्यात आली होती. त्यानंतरही या उद्यानात एकाचवेळी २१ घोड्यांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे कंत्राटदार दोषी आढळण्याची शक्यता आहे. कंत्राटदाराच्या सुरक्षा रक्षकांनी या घोड्यांना कुणाच्या आदेशानुसार पुन्हा प्रवेश दिला यारून कारवाई करण्यात येणार आहे.


बंदी नेमकी कुणावर?

मात्र, दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशानंतर, घोड्यांना आतमध्ये प्रवेश देण्यास बंदी घालण्याऐवजी उद्यान विभागाच्या उपअधिक्षकांनी विधी विभागाकडून अभिप्राय मागवला होता. घोडागाडीवर बंदी असल्यामुळे घोडा चालवण्यास बंदी आहे की घोडे चालवण्यास हरकत नाही याबाबत त्यांनी विधी विभागाकडून मत मागवलं होतं. परंतु या अभिप्रायवर उत्तर येईपर्यंत या घोड्यांना उद्यानात प्रवेश बंदी करणं बंधनकारक होतं.


तेही जबाबदार

पण हे घोडे उद्यानात येत असतानाही त्यावर बंदी घालण्याच्या सूचना उद्यान उपअधिक्षकांनी न दिल्यामुळे तेही तेवढेच जबाबदार मानले जात आहेत. त्यामुळे कंत्राटदारासह उद्यान उपअधिक्षक यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, ए विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली असली तरी याप्रकरणी चौकशीचे आदेश येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका आयुक्तांनीही हे प्रकरण गंभीरतेनं घेतलं असून याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी झाल्यास जयस्वालसह अन्य घोडेमालकाला कोण कोण मदत करत होते हे समोर येणार आहे. त्यामुळे कंत्राटदारासह उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांचं धाबं दणाणले आहेत.



हेही वाचा-

'बाजीराव'ची होणार वैद्यकीय चाचणी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा