मुंबईत मालमत्ता करमाफी होणार! महापालिकेत ठराव मंजूर

  BMC
  मुंबईत मालमत्ता करमाफी होणार! महापालिकेत ठराव मंजूर
  मुंबई  -  

  मुंबईकरांना दिलेल्या महापालिका निवडणूक वचननाम्याची पूर्तता म्हणून ५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करमाफी आणि ५०० ते  ७०० चौरस फुटाच्या घरांना ४० टक्के एवढाच मालमत्ता कर आकारण्याचा ठराव महापालिका सभागृहात करण्यात आला आहे. महापालिकेत हा ठराव एकमुखी करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी महापौरांनी हा ठराव महापालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवला आहे. त्यामुळे आयुक्त आता स्वत:च याबाबत निर्णय घेतात की नगरविकास खात्याकडे हा ठराव पाठवतात, याकडे लक्ष असून आलेल्या सकारात्मक अभिप्रायांनंतरच प्रत्यक्ष अंमलबजावणी करुन मुंबईकरांना कर सवलतीचा लाभ दिला जाणार आहे.


  चर्चेविना ठराव मंजूर

  ही करसवलत देण्यात यावी यासाठी महापालिकेच्या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीचा ठराव सभागृहनेते यशवंत जाधव यांनी मांडला होता. ही ठरावाची सूचना महापालिका सभागृहात एकमुखाने मंजूर झाली. यावर कोणत्याही पक्षाच्या सदस्यांनी हरकत घेतली नाही. त्यामुळे सर्व पक्षीय सदस्यांच्या सहमतीने ठरावाची सूचना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आली.


  करमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात

  ठरावाची सूचना मंजूर होणे म्हणजे निर्णय नसून भविष्यात याबाबतचे धोरण बनवण्यासाठी तसेच नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीकोनातून ठरावाची सूचना ही महत्वाची असते. त्यामुळे ठरावाची सूचना मंजूर करुन मालमत्ता कर माफ व सवलतीचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. सभागृहनेते यशवंत जाधव यांनी शिवसेनेच्या वतीने ही ठरावाची सूचना मांडण्याचा हेतू हा जनतेला दिलेल्या वचननाम्यातील पूर्तता करणे हाच आहे. जनतेला दिलेल्या वचनानुसार जर करमाफी व सवलत द्यायची असेल, तर अशाप्रकारे नियमांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. तो ठराव मंजूर झाल्यामुळे आयुक्त या ठरावावर निर्णय घेतील किंवा नगरविकास खात्याकडे हा ठराव पाठवतील, असे त्यांनी सांगितले.


  भाजपाचा पाठिंबा

  पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचे वचन आम्हीही वचननाम्यात दिलेले आहे. त्यामुळे या ठरावाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. परंतु नगरविकास खात्याकडून जेव्हा हे मंजूर होऊन येईल, तेव्हा आम्ही यात वेगळया सूचना करुन जनतेला आणखी दिलासा देण्याचा प्रयत्न करू, असे भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी स्पष्ट केले.


  मालमत्ता करधारक संख्या
  वसूल होणारा कर
  500 चौ.फुटापर्यंतचे करदाते - 15 लाख
   300 कोटी
  500 ते 700 पर्यंतचे करदाते - 2 लाख
  250 कोटी
  एकूण मालमत्ता करदात्यांची संख्या
  30 लाख
  निवासी मालमत्ता कराची वसुली
  1,100 कोटी रुपये
  मालमत्ता करातून अपेक्षित उत्पन्न
  5,885 कोटी रुपये
  हेही वाचा

  बड्या धेंडांकडील आधी मालमत्ता कराची वसुली करा, मग गरिबांवर कारवाई

  बेस्टप्रमाणे महापालिकेलाही शिवसेना खड्ड्यात घालणार!


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.