Advertisement

मिरची झोंबली! प्रजा फाऊंडेशनला महापालिकेने टाकलं काळ्या यादीत


मिरची झोंबली! प्रजा फाऊंडेशनला महापालिकेने टाकलं काळ्या यादीत
SHARES

माहिती अधिकाराच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांमधील माहिती उपलब्ध करून त्याची विश्लेषणात्मक श्वेतपत्रिका जाहीर करत महापालिकेच्या कारभारावर 'प्रकाशझोत' टाकणाऱ्या 'प्रजा फाऊंडेशन' या संस्थेला महापालिकेने काळ्या यादीत टाकलं आहे. ‘प्रजा’ संस्थेच्या कोणत्याही व्यक्तीला महापालिकेच्या कोणत्याही खात्याने तसेच अधिकाऱ्याने माहिती देऊ नये, असे स्पष्ट आदेश देत प्रशासनाने या संस्थेलाच अस्वीकार्य व्यक्ती म्हणून घोषित केलं आहे.


असहकाराच्या सूचना

मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांच्या स्वाक्षरीने १६ डिसेंबर २०१७ मध्ये 'प्रजा फाऊंडेशन' या अशासकीय संस्थेला अस्वीकार्य व्यक्ती म्हणून जाहीर करण्याचं पत्र लिहिण्यात आलं आहे. या परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व विभागांच्या प्रमुखांना या संस्थेचे पदाधिकारी, प्रतिनिधी व कर्मचारी यांना केणत्याही प्रकारची माहिती देण्यात येऊ नये, त्यांना मदत करू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.



महापालिकेची प्रतिमा मलिन

'प्रजा फाऊंडेशन' ही अशासकीय संस्था माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत महापालिकेच्या आरोग्य व इतर खात्याकडून गेल्या काही वर्षांपासून माहिती मिळवून त्याचं अवैध पद्धतीने विश्लेषण करते. महापालिकेने दिलेल्या माहितीची श्वेतपत्रिका काढून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महापालिकेची प्रतिमा मलिन करते, असं सिद्ध झाल्यामुळे या संस्थेल अस्वीकार्य व्यक्ती म्हणून जाहीर करण्यात आल्याचं डॉ. पद्मजा केसकर यांनी स्पष्ट केलं आहे.


पितळ उघडं पडू नये म्हणून

प्रजा फाऊंडेशनच्या माध्यमातून मागच्या काही वर्षांपासून शिक्षण, आरोग्य आणि इतर विभागाच्या श्वेतपत्रिका काढून महापालिकेच्या कामाचं मूल्यमापण केलं जातं आहे. या माहितीची दखल सर्वसामान्य देखील घेत असल्याने महापालिकेला सातत्याने टीकेला सामोरं जावं लागत आहे.

एवढंच नव्हे, तर नगरसेवक आणि आमदारांच्या कामांचं मूल्यमापन करून त्यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्दयाच्या आधारे माहिती गोळा करून त्याचीही श्वेतपत्रिका प्रकाशीत करण्यात येत असल्याने लोकप्रतिनिधीही धास्तावले आहेत. सर्वांसमोर आपलं पितळ उघडं पडू नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची महपालिकेत चर्चा सुरू आहे.



हेही वाचा-

हजारो रुपये खर्चूनही महापालिका शाळांची गळती थांबेना!

मुंबईत बलात्कार-विनयभंगाचे गुन्हे वाढले


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा