Advertisement

मध्य रेल्वेच्या 'या' मार्गावरील सर्व नाल्यांची सफाई

काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनानं मुंबई महापालिकेला याबाबतची विनंती केली होती. या विनंतीनंतर मुंबई महापालिकेनं अवघ्या १५ दिवसात ही काम पूर्ण केली आहेत.

मध्य रेल्वेच्या 'या' मार्गावरील सर्व नाल्यांची सफाई
SHARES

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवरील छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मुलुंड (central railway) दरम्यान रुळांखालील १५ ठिकाणी नाल्यांच्या बंदिस्त प्रवाह मार्गांची स्वच्छता करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनानं मुंबई महापालिकेला (bmc) याबाबतची विनंती केली होती. या विनंतीनंतर मुंबई महापालिकेनं अवघ्या १५ दिवसात ही काम पूर्ण केली आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी (mumbai rains) निरनिराळ्या प्रकारची कामे संबंधित खात्यांमार्फत पूर्ण करण्यात येतात.

मुंबई महानगर क्षेत्रातील नाल्यांमधील गाळ काढून स्वच्छ्ता करण्याची कामं प्रामुख्यान महानगरपालिका करते. त्याचप्रमाणे ३ ही उपनगरीय रेल्वे हद्दीत लोह मार्गांवरील स्वच्छता, रेल्वे रुळांखालून जाणाऱ्या नाल्यांच्या प्रवाह मार्गामधील गाळ काढण्याची कामे ही रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येतात. रुळांखाली नाल्यांमध्ये पाणी साचून ते लोह मार्गावर येवू नये, यासाठी ही स्वच्छ्ता अतिशय महत्वाची ठरते. मुंबईतील ३ ही उपनगरीय रेल्वे मार्गांवर मिळून सुमारे ११६ कल्व्हर्ट आहेत. यापैकी पश्चिम रेल्वे (western railway) मार्गावर ४१, मध्य रेल्वे मार्गावर ५३ आणि हार्बर रेल्वे मार्गावर २२ कल्व्हर्ट आहेत. यातील बहुतांश खुले तर काही बंदिस्त मार्ग आहेत.

नाल्यांच्या खुल्या प्रवाह मार्गातील गाळ काढणे तुलनेने सोपे असते. तर बंदिस्त प्रवाह मार्गातील गाळ काढून स्वच्छ्ता करणे आव्हानात्मक असते. मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोह मार्गावर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड स्थानकादरम्यान एकूण १८ ठिकाणी रुळांखालून वाहणारे नाल्यांचे बंदिस्त प्रवाह मार्ग (कल्व्हर्ट) आहेत. तेथील गाळ काढून स्वच्छता करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई महापालिका प्रशासनाला अलीकडे झालेल्या पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीत विनंती केली. त्यावेळी मध्य रेल्वेकडे या बंदिस्त प्रवाह मार्गाची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री नाही. त्यामुळे महानगरपालिकेला रेल्वे हद्दीत हे काम करावे, अशी विनंती केली. यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी रेल्वे प्रशासनाची विनंती मान्य केली.

त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याने तातडीने कार्यवाही सुरू केली. पाण्याच्या जोरदार फवाऱ्याने गाळ काढणारे फायरेक्स संयंत्र तैनात करण्यात आले. तसेच यात १८ पैकी १५ ठिकाणी गाळ काढून स्वच्छ्ता पूर्ण करण्यात आली. तर संयंत्र पोहोचू न शकणाऱ्या तीन ठिकाणी मनुष्यबळाच्या साह्याने हे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे.



हेही वाचा - 

लोकलमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी घट

बेस्ट १०० टक्के प्रवासी क्षमतेनं धावणार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा