Advertisement

थकीत वीजबिल भरण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश


थकीत वीजबिल भरण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश
SHARES

बेस्ट उपक्रम तोट्यात असतानाच सरकारी, महापालिका तसेच सामान्य वीज ग्राहकांकडे तब्बल 80 कोटी रुपयांचे बिल थकीत असल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये महापालिकेच्या विविध कार्यालयांचे सुमारे 12 कोटी रुपयांच्या समावेश आहे. त्यामुळे याबाबतचे वृत्त उघडकीस ‘मुंबई लाइव्ह’ने उघडकीस आणताच महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व महापालिका कार्यालयांना थकीत वीज बिलाचे पैसे त्वरीत भरण्याचे आदेश दिले आहेत.

बेस्ट उपक्रम तोटयात असल्यामुळे मुंबई महापालिकेकडून आर्थिक मदतीची मागणी केली जात असतानाच नफ्यात असलेल्या विद्युत विभागाचीच तब्बल 48 कोटींची रक्कम थकीत आहे. यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेकडेच 38 कोटींची थकबाकी आहे, तर सामान्य जनतेकडे 10 कोटींची आहे. तर याशिवाय सुमारे 33 कोटी रुपयांचा चुना विद्युत ग्राहकांनी लावला असल्याची बाबच मुंबई लाइव्हने समोर आणली होती. या वृत्ताची दखल घेऊन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सोमवारी सकाळी सर्व विभाग कार्यालय, विभागांचे प्रमुख यांना आदेश देत थकीत वीज बिलाची रक्क्कम त्वरीत भरण्यास सांगितले आहे. थकीत बिलापोटी महापालिकेचे कोटी रुपये असून 9 कार्यालयांच्या ठिकाणी थकीत बिल न भरण्यामुळे तेथील विद्युत मीटर काढण्यात आले आहे. त्यामुळे हे मीटर काढल्यामुळे तब्बल 1 कोटी रुपयांची रक्कम बुडीत आहे. ही सर्व थकीत रक्कम त्वरीत भरण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

महाव्यवस्थापक जाणार नाही कॅनडाला

बेस्ट तोट्यात असल्यामुळे महाव्यवस्थापकांनी कॅनडाला जाण्यास नकार कळवला आहे. नवी दिल्लीतील राज्य मार्ग परिवहन उपक्रम महामंडळाच्या वतीने कॅनडातील मॉन्ट्रिअल येथे युआयटीपी ग्लोबल पब्लिक ट्रान्सपोर्ट समीट 2017 अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 15 ते 17 मे 2017 या कालावधीत भरला जाणार आहे. या कार्यक्रमाकरता बेस्टच्या महाव्यवस्थापकांची प्रतिनियुक्ती करण्यात येणार आहे, शिवाय मॉन्ट्रिअल येथील जवळच्या शहरांमध्ये तांत्रिक बाबींसाठी भेट दिली जाणार आहे. महाव्यवस्थापकांच्या या प्रतिनियुक्तीसाठी बेस्ट समितीने मान्यता दिली होती. या प्रतिनियुक्तीचा खर्च जरी राज्य मार्ग परिवहन महामंडळ विकास निधी योजनेतून करण्यात येणार असला तरी तुर्तास हा खर्च बेस्ट उपक्रमास करावा लागणार होता. महाव्यवस्थापकांच्या या प्रतिनियुक्तीच्या आठ दिवसांच्या कालावधीत प्रतिदिन 125 युएस डॉलर एवढा खर्च येणार आहे. त्यामुळे उपक्रम बिकट आथिर्क परिस्थितीतून जात असल्यामुळे महाव्यवस्थापकांनी कॅनडाला जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची बदली होऊन त्यांच्या जागी सुरेंद्र बागडे यांची नियुक्ती करण्यत आली आहे.

बेस्टच्या 75 बसेस मंगळवारपासून धावणार

बेस्ट उपक्रमाने टाटा मोटर्सकडून 303 अत्याधुनिक बसेसची खरेदी केली असून यापैकी 75 बसेस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या बेस्ट बसेसचे लोकार्पण मंगळवारी वडाळा आगार येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह महापालिकेतील नेते, वैधानिक अध्यक्ष तसेच महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे लोकार्पणानंतर या बसगाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा