'रस्त्यालगतचा राडारोडा पावसाळ्यापूर्वी उचला'

 CST
'रस्त्यालगतचा राडारोडा पावसाळ्यापूर्वी उचला'
CST, Mumbai  -  

मुंबईतील अनेक भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरु असून येत्या 15 मे पर्यंत यापैकी काही कामे पूर्ण करायची आहेत. या कामांसाठी अनेक ठिकाणी बांधकामांचे साहित्य, डेब्रीज, संरक्षक कठडे, तसेच अन्य सामान रस्त्यांच्या कडेला पडून आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या कडेला असलेला राडारोडा त्वरीत उचलण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व उपायुक्तांना दिले आहेत.

मुंबईतील अनेक ठिकाणी रस्त्यांची विविध कामे तसेच पुलांच्या पृष्ठभागांचे सपाटीकरणाची कामे सध्या वेगात सुरू आहेत. या सर्व कामांची देखरेख परिमंडळीय उपायुक्तांच्या आणि प्रमुख अभियंत्यांच्या स्तरावर नियमितपणे सुरु आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मंगळवारी एका विशेष बैठकीचे आयोजन करून हा आढावा घेताना, रस्त्यांची कामे जसजशी पूर्ण होतील, तसतसे त्या-त्या ठिकाणचे न वापरलेले बांधकाम साहित्य, राडारोडा आणि संरक्षक कठडे हे तातडीने उचलण्याचे तसेच संबंधित रस्ते वाहतुकीसाठी त्वरीत खुले करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत प्राधान्यक्रम 1 मध्ये 100 कामे आणि प्राधान्य क्रम 2 मध्ये 938 पैकी 469 रस्त्यांची कामे येत्या 15 मेपर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले करून दिले जाणार आहेत.

मुंबईतील 30 पुलांवरील रस्त्यांच्या कामांपैकी 28 पुलांवरील रस्त्यांच्या सपाटीचे कामे 15 मे पर्यंत पूर्ण होतील. यामध्ये मुंबई सेंट्रल स्टेशनजवळील बेलासिस पूल आणि डायना पूल, करी रोड पूल, हिंदमाता पूल, चिंचपोकळी पूल, परळ पूल, शीव रुग्णालयाजवळील पूल, गोवंडी पूल, पी दक्षिण विभागातील वीर सावरकर पूल आदी पुलांचा समावेश आहे. तर वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान ते परळ या दरम्यान असणारा 2.38 किमी लांबीचा लालबाग पूल आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील ‘डबल डेकर’ पद्धतीचा 2.55 किमी लांबीच्या पुलांची कामे ही 30 मेपर्यंत पूर्ण होतील.
- शितलाप्रसाद कोरी, प्रमुख अभियंता

Loading Comments