Advertisement

कोणी किती लाटल्या कचरापेट्या? यादी जाहीर करण्याची नगरसेवकांची मागणी

आजी-माजी नगरसेवकांनी कचरापेट्या लाटल्या असून त्यांची यादी जाहीर करावी आणि या पेट्या महापालिका अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्या सध्याच्या नगरसेवकांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

कोणी किती लाटल्या कचरापेट्या? यादी जाहीर करण्याची नगरसेवकांची मागणी
SHARES

मुंबई महापालिकेत नवीन नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रत्येक सोसायटी आणि वसाहतींकडून २४० आणि १२० लिटर क्षमतेच्या कचरापेट्यांची मागणी होत आहे. पण ८ महिने होऊनही नगरसेवकांना नवीन कचरापेट्या उपलब्ध झालेल्या नाहीत.


नवीन कंत्राटदाराचा शोध सुरू

आधीच्या कंत्राटदाराचा कालावधी शिल्लक असला तरी कचरापेट्यांचा कोटा पूर्ण झाल्यामुळे नवीन कंत्राटदाराचा शोध सुरू झाला आहे. मात्र, या कचरापेट्या निवडणुकीअगोदर दिल्याने आचारसंहितेमुळे त्याचं वाटप करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे अनेक आजी-माजी नगरसेवकांनी कचरापेट्या लाटल्या असून त्यांची यादी जाहीर करावी आणि या पेट्या महापालिका अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्या सध्याच्या नगरसेवकांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.


मागणीनंतरही कचरापेट्या मिळाल्या नाही 

मुंबईतील विविध सार्वजनिक ठिकाणी गोलाकार लटकत्या स्टेनलेस स्टिलच्या १,५५० कचराकुंड्या खरेदीचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी नवीन नगरसेवकांना अद्यापही २४० लिटर आणि १२० लिटरच्या कचरापेट्या मिळालेल्या नसून सोसायटींकडून मागणी होऊन त्यांना या कचरापेट्या देता येत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे एकप्रकारे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 


कचरापेट्या कशा पुरवणार?

शिवसेनेच्या राजूल पटेल यांनीही के/पश्चिम विभागात १,००० कचऱ्याचे डबे मिळणार आहेत. मग एवढ्या नगरसेवकांमध्ये त्यांचं वाटप करणार कसं, असा प्रश्न त्यांनी केला. कचराकुंड्या खरेदीत अडथळा येत असेल, तर विभाग कार्यालयांना स्पॉट कोटेशन काढून खरेदी करण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना मंगेश सातमकर यांनी केली. 


डबे ताब्यात घ्या

भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी विद्यमान कंत्राटदाराची मुदत अद्यापही संपलेली नाही. परंतु पुरवठा करण्यात येणाऱ्या पेट्यांची संख्या पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांना या पेट्या देता येत नाहीत. त्यामुळे महापालिकेने पुरवलेल्या कचरापेट्या ज्या नगरसेवकांनी अधिक प्रमाणात घेतल्या अशा टॉप १० नगरसेवकांची यादी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी कोटक यांनी केली. हे सर्व डबे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन त्याचं वाटप करावं, अशीही सूचना त्यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत संजय घाडी, रईस शेख, आशिष चेंबूरकर, शुभदा गुडेकर अलका केरकर, समिक्षा सक्रे आदींनी भाग घेतला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी कचरापेट्यांबाबतची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितलं.



हेही वाचा - 

हा नाला की कचरापेटी?


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा