Advertisement

दहिसर रेल्वे स्थानकाने घेतला मोकळा श्वास, अतिक्रमणे दूर


दहिसर रेल्वे स्थानकाने घेतला मोकळा श्वास, अतिक्रमणे दूर
SHARES

दहिसर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई करत परिसर मोकळा केला. स्थानकासमोरील आणि तिकीट घरासमोरच झाडाचा आधार घेत बांधलेल्या दुकानदारांनी मागील ८ ते ९ वर्षांपासून महापालिकेला टोलवत ठेवले होते. येथील काही अधिकृत दुकानदारांना पर्यायी जागा दिल्यानंतरही या दुकानदारांनी पर्यायी जागेचा ताबा घेण्यास टाळाटाळ केल्यानंतर अखेर या अधिकृत दुकानदारांवरही कारवाई करून भरूचा मार्गाचा बॉटलनेक मोकळा करून जावळे मार्गाच्या रुंदीकरणातील अडसरच दूर केला.

ही कारवाई महापालिकेच्या आर-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


भरूचा मार्गावरील 'बाॅटलनेक'

दहिसर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील भरुचा मार्गावरील 'बॉटलनेक' तसेच जावळे मार्गाच्या रुंदीकरणात येथील सुमारे १० ते ११ दुकाने येत होती. याठिकाणी असलेली वडापाव विक्रेता, फरसाणचे दुकान तसेच कांदे बटाटे तसेच भाजीची दुकाने होती. ही सर्व दुकाने रस्त्यांच्या आड येत असल्यामुळे मागील दोन दिवसांपूर्वी या दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे भरूचा मार्गावरील बॉटलनेक खुला झाला आहे.



पर्यायी जागा देऊनही नकार

जावळे मार्ग विकास नियोजनातील रस्ता असून या मार्गावर आणि भरूच्या मार्गावर अतिक्रमण झाले होते. हा विकास नियोजनातील रस्त्याचे काम हाती घेण्यासाठी येथील पात्र दुकानदारांना २००८ रोजी नोटीस दिली होती. त्यानंतर पात्र दुकानदारांना पर्यायी जागाही दहिसरमध्ये उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतु त्यांनी त्या पर्यायी जागा स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे रस्त्यांच्या विकासकामाला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ११ दुकानांवर ही कारवाई करण्यात आल्याचे आर-उत्तर विभाग कार्यालयाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी स्पष्ट केले. यांत ५ दुकाने अधिकृत, तर ६ दुकाने अनधिकृत होती.



नागरिकांची सोय

महापालिकेचा अतिक्रमण विभाग, दुकान आस्थापने विभाग तसेच इतर कर्मचारी आणि कामगार तसेच पोलिस यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे दहिसर पूर्व स्थानक परिसर मोकळा झाला आहे. येथील अतिक्रमण हटवण्यात आल्यामुळे या रस्त्यावरुन रिक्षांची तसेच इतर वाहनांची ये-जा होऊ शकते. अतिक्रमणे तोडण्यात आल्यानंतर त्याठिकाणी दोन मोठी विशाल झाडे आहे. ही झाडे कापण्यास मान्यता घेतली जाईल. त्यानंतर ही झाडे कापल्यास वाहतुकीसाठी हा रस्ता खुला होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.



हेही वाचा -

नैसर्गिक विधीसाठी जायचं कुठं? प्रेमनगरच्या रहिवाशांचं शौचालयासाठी 'टमरेल' आंदोलन

महापालिका गटविम्यांचा अंतिम निर्णय आठवड्याभरात; सर्वांचे दावे निकालात काढणार


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा