Advertisement

रघुवंशी मिलमधील ४० गाळ्यांवर कारवाई


रघुवंशी मिलमधील ४० गाळ्यांवर कारवाई
SHARES

लोअर परळमधील रघुवंशी मिल कंपाऊंडमधील व्यावसायिक गाळ्यांची पाहणी करून मुंबई महापालिकेने ४० गाळ्यांमधील अनधिकृत बांधकाम तोडलं. यामध्ये वाढीव बांधकाम, पावसाळी शेड, फलक यांचा समावेश होता. सोबतच विनापरवाना साठवून ठेवण्यात आलेला ७ टन सिल्क कापडाचा साठाही महापालिकेने जप्त केला. कमला मिलमधील आगीच्या दुघर्टनेनंतर महापालिकेने रघुवंशी मिल, तोडी कंपाऊंडसह शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला होता. त्यानंतरची ही मोठी कारवाई आहे.

महापालिकेच्या जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र कुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली रघुवंशी मिलमधील सर्व गाळ्यांमधील अनधिकृत व वाढीव बांधकामांवरील कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये सर्व गाळ्यांची पाहणी करून सर्व्हे अहवाल तयार करण्यात आल्यानंतर या सर्व गाळ्यांवर कारवाई करण्यात आली.



पाहणीनंतर कारवाई

रहुवंशी मिल कंपाऊंडमधील रेस्टाॅरंट, फर्निचर शोरूम, टाईल्स शोरूम, मार्बल शोरूम, वॉलपेपर शोरूम, इलेक्ट्रीक वस्तुंचे शोरुम, डिझाईन स्टुडिओ, क्रॉकरी शोरूम, कार्यालये, मर्सिडीज सर्व्हिस सेंटर, शेड आदींची पाहणी करून ही कारवाई करण्यात आली. या सर्व ठिकाणी अनधिकृत बांधकाम, प्रोजेक्शन, वाढीव बांधकाम, ओट्याचे वाढीव बांधकाम, पावसाळी शेड्स, साईन बोर्ड, शेड्स, ज्वलनशील पदार्थाचा साठा अनधिकृतरित्या केल्याचं आढळून आलं.


कुणावर कारवाई?

१ भट्टी, ३ सिलिंडर जप्त करत हॉटेल झेनला सिल करण्यात आलं. या हॉटेलकडे अग्निशमन दलाची एनओसी नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तर तळघरातील ५००० चौरस फुटाच्या जागेत ज्वलनशील सिल्क कपड्याचे ७ टन वजनाचे रोल ठेवण्यात आल्याने श्री कृष्णा सिल्क इंडस्ट्रीजचा हा माल जप्त करण्यात आला.

अग्निशमन दल, इमारत व कारखाने विभाग, परवाना विभाग, आरोग्य विभाग, दुकान व आस्थापने विभाग आदी विभागांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आल्याचं जी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र कुमार जैन यांनी स्पष्ट केलं. यामध्ये ६ अधिकारी, १५ कामगार, २ जेसीबी, २ गॅस कटर, १ काँक्रेट ब्रेकर, २ डंपर २ लॉरी आदींच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा