Advertisement

महापालिका कर्मचाऱ्यांना कामावर अर्धा तास उशिरा येण्याची मुभा!


महापालिका कर्मचाऱ्यांना कामावर अर्धा तास उशिरा येण्याची मुभा!
SHARES

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आल्यानंतर त्यातील तांत्रिक त्रूटी आणि कर्मचाऱ्यांचा कापला गेलेला पगार यामुळं मोठा वादंग माजला होता. बायोमेट्रिक हजेरी अचूक वेळेवर नोंद न झाल्यास कर्मचाऱ्यांचा लेट मार्क दर्शवला जायचा. त्यामुळे कर्मचारी वर्ग हवालदिल झाला होता. यावर उपाय म्हणून महापालिकेनं कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा येण्याची सवलत देण्याचा निर्णय घेतला अाहे. याबाबतचं परिपत्रक तयार करण्यात आलं असून यावर आयुक्तांची स्वाक्षरी होणं बाकी आहे.


तीन लेट मार्कनंतर पैसे कापतात

बायोमेट्रीक हजेरीनुसार, महापालिका कर्मचाऱ्यांची हजेरी उशिरा नोंदवली गेली तर त्यांना लेट मार्क दिला जातो. तीन लेट मार्क झाल्यानंतर प्रत्येक लेटमार्कनुसार कामाच्या तासाचे पैसे पगारातून कापले जातात. याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संताप उसळला होता. हे लक्षात घेता महापालिका सामान्य प्रशासनानं कर्मचाऱ्यांना हजेरी नोंदवण्यासाठी अर्ध्या तासाची सवलत दिली आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानंतरच याबाबतचं परिपत्रक बनवण्यात येत आहे.


...तर लेट मार्क नोंदवला जाईल

या अर्धा तासाच्या सवलतीनंतरही कर्मचाऱ्याची हजेरी अर्ध्या तासाच्या वर उशिराने नोंदवली गेल्यास त्यांचा लेटमार्क नोंदवला जाईल. अर्ध्या तासावर जितकी मिनिटे उशिरा येईल, तेवढा अधिक वेळ काम करणं कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात अालं अाहे. समजा, अर्धा तास उशिर झाल्यास, त्या कर्मचाऱ्याला अर्धा तास अधिक काम करावं लागणार अाहे. त्यानंतरही तीन लेटमार्क झाल्यास पूर्वीच्या पद्धतीनुसार पगारातील पैसे कापले जातील.


परिपत्रक स्वाक्षरीसाठी अायुक्तांकडे

याबाबतच्या परिपत्रकावर शेवटचा हात फिरवला असून हे परिपत्रक आयुक्तांच्या स्वाक्षरीकरिता पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आयुक्तांची स्वाक्षरी झाल्यानंतर सामान्य विभागाच्या माध्यमातून हे परिपत्रक सर्व विभागांना जारी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले अाहे.


हेही वाचा -

महापालिका अभियंत्यांचे अाता 'नो एक्स्ट्रा टाइम वर्क'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा