Advertisement

फेरीवाला धोरणाच्या हरकती व सूचनांसाठी १५ दिवसांची मुदतवाढ


फेरीवाला धोरणाच्या हरकती व सूचनांसाठी १५ दिवसांची मुदतवाढ
SHARES

मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी फेरीवाला व ना फेरीवाला क्षेत्रांची यादी जाहीर करून त्यावर लोकांकडून हरकती व सूचना मागवल्या जात आहेत. या हरकती व सूचनांची मुदत ३१जानेवारीला संपुष्टात आल्यानंतर आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी फेरीवाल्यांसह नागरिकांना आपल्या हरकती व सूचना नोंदवण्यासाठी आणखी १५ दिवस वाढवून मिळाले आहेत.

मुंबईत फेरीवाला धोरण लागू करण्यासाठी महापालिकेने फेरीवाला क्षेत्रांची यादी प्रसिद्ध करून त्यावर लोकांच्या हरकती व सूचना मागवल्या आहे. परंतु ही न्यायालयाला सादर केलेली जुनीच यादी असून न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार सुधारीत यादी केलेली नाही. त्यामुळे अनेक छोट्या पदपथ असलेल्या रस्त्यांवरही फेरीवाला क्षेत्र निश्चित झालेले आहे. त्यामुळे या फेरीवाला क्षेत्रांबाबत लोकांकडून हरकती व सूचना जाणून घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने ३१ जानेवारी २०१८पर्यंतची मुदत दिली होती.


मुदतवाढीची मागणी

लोकांकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून मुदत वाढवण्याची मागणी झाल्याने आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत लोकांकडून फेरीवाला क्षेत्राबाबत लोकांकडून हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार असल्याचे उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत इमेलद्वारे सुमारे १४०० तर पत्राद्वारे ६०० हरकती व सूचना महापालिकेला प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.



शासकीय कार्यालय उभारा

दरम्यान, मनसेचे उपाध्यक्ष व माहीम उपविभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार, नगरसेवक संजय तुर्डे यांच्यासह मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन फेरीवाला क्षेत्राबाबत सूचना व हरकती नोंदवल्या. यामध्ये दादर-माहीम विभागातील फेरीवाला क्षेत्राबाबतही हरकती नोंदवल्या आहेत. यामध्ये केशवसूत उड्डाणपुलाखाली शासकीय कार्यालये उभारली जावीत, अशी सूचना केली आहे.


कुठल्या सूचना?

महापालिकेने फेरीवाला भाग म्हणून जे काही मार्ग निवडले आहेत, त्यावर व्यवसाय करून फेरीवाल्यांना कोणताही फायदा होणार नाही. कारण लोकांची वर्दळ नसलेल्या भागात फेरीवाला क्षेत्र बनवले आहे. याशिवाज जे रस्ते ना फेरीवाला क्षेत्र म्हणून निवडले आहेत, त्याठिकाणी ज्याप्रमाणे १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव करण्यात येतो, त्याप्रमाणे वाहने उभी करण्यासही मज्जाव करण्यात यावा. या वाहनांवरही फेरीवाल्यांप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. रिक्षा, टॅक्सी तळ तसेच बस स्थानकाशेजारी वृत्तपत्र विक्रेता तसेच चहा विक्रेतांना बसण्यास परवानगी देण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा