Advertisement

मराठा मोर्चासाठी मुंबई सज्ज! महापालिकेच्या विशेष सुविधा...


मराठा मोर्चासाठी मुंबई सज्ज! महापालिकेच्या विशेष सुविधा...
SHARES

मुंबईत येत्या बुधवारी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निघणाऱ्या मोर्चाला होणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेने यासाठी मोफत पाण्याची तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहरातील अनेक भागांमध्ये पाण्यासाठी टँकर, फिरती शौचालये तसेच वैद्यकीय शिबिरांची व्यवस्था करण्यात आली आहे. आजवर कोणत्याही मोर्चासाठी महापालिकेच्या वतीने मोफत सेवा सुविधा देण्यात आली नव्हती.


मराठा मोर्चाची दखल

मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी राज्यभरात मोर्चे निघाले आहेत. मराठा समाजाने आरक्षणासाठी राज्यभरात मोर्चे काढून प्रत्येक गाव आणि शहरे पिंजून काढल्यानंतर येत्या बुधवारी ९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात हा भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा भायखळा राणीबाग ते आझाद मैदान असा असणार आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होणार असल्याने साहजिकच मुंबईतील सर्व सेवा आणि सुविधांवर याचा ताण पडणार आहे.


७ ठिकाणी १५ फिरती शौचालये

मुंबईत या मोर्चासाठी एकूण सात ठिकाणी फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली आहे. 

प्रतीक्षानगर नाला - 2

जे. के. केमिकल्स नाल्याशेजारी - 3

बीपीटी एरिया सिमेंट यार्ड - 4

इ. एस. पाटणवाला मार्ग - 2

भायखळा ह्युम हायस्कूल - 1

हज हाऊस शेजारी - 1

आझाद मैदान - 2


४ ठिकाणी ८ पाण्याचे टँकर

शीवपासून आझाद मैदानापर्यंत चार ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था केलेली आहे. या सर्व ठिकाणी आठ पाण्याचे टँकर ठेवण्यात आले आहेत. 

वसंतराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय - 2

बीपीटी सिमेंट यार्ड - 4

राणीबाग - 1

आझाद मैदान - 1


६ ठिकाणी वैद्यकीय पथके सज्ज

याशिवाय सहा ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आलेली आहेत. यामध्ये दहा पुरुष आणि दहा महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रत्येकी एक पथक तयार करून ही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे. 

प्रियदर्शनीशेजारी - 20

जिजामाता उद्यान-राणीबाग - 20

जे. जे. उड्डाणपूल - 20

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - 20

बीपीटी सिमेंट यार्ड(वाहनतळ) - 10

या सर्व वैद्यकीय पथकांची जबाबदारी ही केईएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रविण बांगर यांच्यावर सोपवली आहे. यामध्ये तीन पथके ही महापालिका रुग्णालयाच्या वतीने तर ३ पथके ही राज्य सरकारच्या वतीने तैनात करण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे, तर या मोर्चाच्या जागांमध्ये वाहने असल्यास ती उचलण्याची, तसेच वाहने बंद पडल्यास ती उचलण्यासाठी टोइंग व्हेइकलचीही व्यवस्था करण्यात आल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. याला परिमंडळ २चे उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांनीही दुजोरा दिला आहे.


नितेश राणेंच्या पत्रानंतर आली जाग!

मराठा मोर्चासाठी महापालिकेच्या वतीने प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात, यासाठी लागणारे शुल्क आपण महापालिकेला अदा करू, असे काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून कळवले होते. त्यांच्या पत्रानंतर अखेर महापालिका प्रशासनाने स्वत:च ही सुविधा मोफत पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.





हेही वाचा

9 ऑगस्टला 2 लाख मुंबईकर राहणार उपाशी!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा