समिती अध्यक्षांवर सभागृहनेत्यांची ‘दबंगगिरी’

  Mumbai
  समिती अध्यक्षांवर सभागृहनेत्यांची ‘दबंगगिरी’
  मुंबई  -  

  मुंबई महापालिकेत यंदा भाजपाने कोणतीही समिती न घेतल्यामुळे वैधानिक आणि विशेष समित्या या शिवसेनेच्या ताब्यात आलेल्या आहेत. परंतु या समिती अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सर्व अध्यक्षांना आपल्या मुठीत ठेवण्याचा खटाटोप सभागृहनेते यशवंत जाधव यांच्याकडून सुरू आहे. सभागृहनेत्यांनी सर्व समिती अध्यक्षांना आपापल्या समिती अखत्यारित येणाऱ्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यशवंत जाधव यांची दबंगगिरी सर्व समिती अध्यक्षांवर आपला वचक ठेवून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आहे की, नवख्या नगरसेवकांवर आपली हुकूमत गाजवत त्यांना मुठीत ठेवण्यासाठी केली जात आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

  मुंबई महापालिकेत स्थायी समिती, सुधार समिती, बेस्ट समिती, शिक्षण समिती, सार्वजनिक आरोग्य समिती, विधी आणि महसूल समिती, महिला आणि बाल कल्याण समिती, स्थापत्य (शहर) समिती, स्थापत्य (उपनगरे), बाजार आणि उद्यान समिती, प्रभाग समिती आदी समित्यांच्या अध्यक्षांना फर्मान काढून आपापल्या अखत्यारित येणाऱ्या क्षेत्राची तसेच सुरू असलेल्या कामांची पाहणी करून त्याचा अहवाल आपल्याला सादर करण्याचे आदेश सभागृहनेते यशवंत जाधव यांनी दिले असल्याची चर्चा सध्या महापालिकेत जोरात ऐकायला मिळत आहे. सभागृहनेते पदी विराजमान झालेल्या यशवंत जाधव यांचे ट्युनिंग अजूनही नवीन आलेल्या नगरसेवकांसोबत जुळताना दिसत नाही. त्यामुळे पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेत काम करताना वारंवार समिती अध्यक्षांना त्यांच्या कामांची आठवण करून देण्याचा प्रयत्न जाधव करून देत असतात. काही दिवसांपूर्वीच जाधव यांनी आरोग्य समिती अध्यक्षांना रुग्णालये, दवाखाने, प्रसुतीगृह तसेच आरोग्य केंद्रांची पाहणी करण्यास तर बाजार व उद्यान समिती अध्यक्षांना मार्केटची तसेच उद्यानांची पाहणी, तर स्थापत्य समिती अध्यक्षांना नालेसफाईच्या कामांसह रस्ते आणि इतर कामांची पाहणी करून आपला अहवाल देण्यास सांगितल्याचे समजते.

  यशवंत जाधव यांनी दिलेल्या या सूचना आहेत की आदेश हेच आता या समिती अध्यक्षांना कळेनासे झाले आहे. पक्षाचे नेते म्हणून त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम करणे हे आमचे कर्तव्य असले तरी यमागे हुकूमत गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे काहींचे म्हणणे आहे. सभागृहनेते म्हणून वचक ठेवणे हे जरी योग्य असले तरी त्यामध्ये हुकूमशाही नाही. परंतु यशवंत जाधव यांच्या वर्तनातून ते मार्गदर्शक नाही तर हुकूमशाही गाजवण्याच्या दृष्टीकोनातून वचक ठेवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे नवखे नगरसेवक त्रस्त झाले आहेत.

  सभागृहनेत्यांची कार्यालयातील हजेरी रात्री 11 वाजेपर्यंत

  सभागृहनेते पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर यशवंत जाधव यांनी विविध विषयांचा अभ्यास करण्याचा निर्धार केला असून यासाठी ते रात्री उशिरापर्यंत म्हणजे अकरा वाजेपर्यंत महापालिका मुख्यालयातील कार्यालयातच ठाण मांडून असतात. सर्वसाधारणपणे महापालिकेतील सर्व कार्यालयांमधील कर्मचारी वर्ग हा सहा वाजता निघून जातो आणि महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त हेही साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत निघून जात असतात. परंतु सभागृहनेते हे रात्री अकरा वाजेपर्यंत कार्यालयात बसून विविध विषयांचा अभ्यास करत असतात. मात्र, झपाटून सर्व विषयांची माहिती गोळा करून अभ्यास केला जात असला तरी प्रत्यक्षात सभागृहनेत्यांना आपली चमक सभागृहात दाखवता आलेली नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.