Advertisement

महापालिकेचे भविष्य ‘वाणी’


महापालिकेचे भविष्य ‘वाणी’
SHARES

मुंबई - मुंबई महापालिकेचा कारभार हा शिवसेनेने 'वाण्यां'वर सोपवला आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी वैश्यवाणी समाजाचे विश्वनाथ महाडेश्वर, स्थायी समिती अध्यक्षपदी रमेश कोरगावकर यांच्यावर सोपवून सुधार समिती अध्यक्षपदाचे उमेदवार अनंत (बाळा) नर यांची वर्णी लावली आहे. त्यामुळे महापलिकेचा कारभार हा वाण्यांच्या हाती सोपवण्यात आला असून, महापालिकेचा कारभार पाररदर्शक बनवण्यासाठी आणि भाजपाला शह देण्यासाठी शिवसेनेने महापलिकेत ही भविष्यवाणी अवलंबली असल्याची चर्चा आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शेवटच्या क्षणाला उमेदवारी मिळवून महापौर होण्याचा मान प्राचार्य विश्वनाथ महाडेश्वर यांनी मिळवला. महाडेश्वर यांच्या निवडीमुळे वैश्यवाणी समाजाचा महापौर मुंबईला मिळाला. महापौरपदाच्या या निवडीनंतर शिक्षण समिती अध्यक्षपदी निवड झालेल्या शुभदा गुडेकर याही वैश्यवाणी समाजाच्या असून, त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष निवड झालेले रमेश कोरगावकर हेही वैश्यवाणी समाजाचे आहेत. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, शिक्षण समिती अध्यक्ष हे वैश्यवाणी समाजाचे बनल्यानंतर सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षपदाचे उमेदवारही वैश्यवाणी समाजाचेचे दिले आहे. सुधार समिती अध्यक्षपदासाठी बाळा नर आणि बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी अनिल कोकीळ यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता उपमहापौरपद वगळता अन्य सर्व पदांवर शिवसेनेने वैश्यवाणी समाजाच्या नगरसेवकांना प्रतिनिधीत्व दिले असल्यामुळे महापलिकेवर वाणी समाजाचा प्रभाव दिसून येत आहे. महाडेश्वर यांचे महापालिका सदस्यत्व हे वैश्यवाणी समाजाचे असल्यामुळे जातप्रमाणपत्र वैधता समितीने रद्द केले होते. सध्या महाडेश्वर यांनी खुल्याप्रवर्गातून निवडणूक लढवली असून, त्यांना महापौरपदाचीच लॉटरी लागली आहे.

रेल्वेचा मोनो ऑपरेटर बनला स्थायी समिती अध्यक्ष

स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झालेले रमेश कोरगावरक हे मध्य रेल्वेच्या भायखळा येथील प्रिटींग प्रेसमध्ये मोनो ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. रेल्वेची २३ वर्षे सेवा केल्यानंतर मार्च २००२च्या निवडणुकीत राजीनामा देत त्यांनी निवडणूक लढवली होती. तेव्हापासून सलग चौथ्यांदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये कार्यरत असलेल्या आणि स्थानिक लोकाधिकारी समितीचे पदाधिकारी सूर्यकांत आंबेकर यांचा पत्नी स्नेहल आंबेकर यांना महापौर बनण्याचा मान मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या स्थानिय लोकाधिकारी समिती पदाधिकारी असलेल्या रमेश कोरगावर यांना स्थायी समिती अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळाला आहे.

सुधार आणि बेस्ट समिती अध्यक्षपदाची निवड बिनविरोध

स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाप्रमाणेच काँग्रेसने सुधार समिती आणि बेस्ट समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार दिला नाही. त्यामुळे सुधार समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या बाळा नर आणि बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या अनिल कोकीळ यांची बिनविरोध निवड होणार आहे. बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी नव्याने निवडून आलेल्या अनिल कोकीळ यासारख्या नवख्या नगरसेवकाला उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेतच प्रचंड रोष असून, कोकीळ यांना कोंडीत पकडण्याची पूर्ण तयारी भाजपाने केल्याचे समजते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा