Advertisement

फक्त ३३ दिवसांत होईल महापालिकेच्या भाडेतत्वावरील मालमत्तांचं हस्तांतरण

महापालिकेनं आपल्या अखत्यारितील भाडेतत्वावरील मालमत्तांचं हस्तांतरणही आॅनलाईऩ पद्धतीनं सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ जानेवारीपासून आॅनलाईन सेवेला प्रारंभ झाला आहे. ३१ डिसेबर २०१८ पर्यंत भाडेकरूंना पालिका कार्यालयात जात कागदपत्र जमा करावी लागत होती, फाईल तयार करत हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती.

फक्त ३३ दिवसांत होईल महापालिकेच्या भाडेतत्वावरील मालमत्तांचं हस्तांतरण
SHARES

मुंबई महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या मालमत्ता खात्याच्या अखत्यारीतील मालमत्तांचं हस्तांतरण करणं आता आणखी सोपं होणार आहे. १ जानेवारीपासून महापालिकेनं भाडेतत्वावरील मालमत्तांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीनं सुरू केली आहे. ही हस्तांतरणाची प्रक्रिया ३३ दिवसांमध्ये पूर्ण करणं महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे हस्तांतरण वेगानं होणार असून त्याचा फायदा महापालिकेच्या भाडेतत्वावरील इमारतीत राहणाऱ्या ४६ हजार ५६३ भाडेकरूं (निवासी-अनिवासी) ना मिळणार आहे.


वेगवान, पारदर्शक

मुंबई महापालिकेनं आपला कारभार वेगवान आणि पारदर्शक होण्यासाठी 'ईज आॅफ डुइंग बिझनेस'अंतर्गत आॅनलाईन पद्धतीला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे सध्या महापालिकेच्या अनेक विभागातील काम जसं जन्म-मृत्यू दाखल, इमारत बांधकाम परवानगी, अग्निसुरक्षा विषयक परवानग्या आणि इतर सेवा आॅनलाईन पद्धतीनं देण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेच्या या निर्णयाचा चांगलचा फायदा नागरिकांना होत आहे. महापालिकेच्या कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज आता नागरिकांना उरलेली नाही.


प्रक्रिया झाली सोपी

यापुढं जात महापालिकेनं आपल्या अखत्यारितील भाडेतत्वावरील मालमत्तांचं हस्तांतरणही आॅनलाईऩ पद्धतीनं सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ जानेवारीपासून आॅनलाईन सेवेला प्रारंभ झाला आहे. ३१ डिसेबर २०१८ पर्यंत भाडेकरूंना पालिका कार्यालयात जात कागदपत्र जमा करावी लागत होती, फाईल तयार करत हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. आता मात्र घरबसल्या कागदपत्र जमा करत हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करणं भाडेकरूंना सहजशक्य झालं आहे.


'या' संकेतस्थळावर

महापालिकेच्या www.mcgm.gov.in वा https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर आॅनलाईन सेवा हा पर्याय निवडल्यास पालिकेच्या आॅनलाईन सेवांची सूची समोर येते. त्यात इस्टेट डिपार्टमेन्ट वर क्लिक करत हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.


अधिकाऱ्यांवर बंधन

भाडेकरूंचा आॅनलाईन अर्ज सादर झाल्यानंतर पुढची प्रक्रिया पूर्ण करत, शुल्क भरून ३३ दिवसांमध्ये हस्तांतरण करून देणं संबंधित अधिकाऱ्याला बंधनकारक असणार असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता खात्याचे सहाय्यक आयुक्त पराग मसूरकर यांनी दिली आहे. निवासी वा अनिवासी मालमत्तांचं वारसाहक्कानं वा इतर स्वरूपात हस्तांतरण करणाऱ्यांसाठी आता ही दिलासादायक बाब आहे.

दरम्यान आॅनलाईन अर्जात ईमेल वा दुरध्वनी क्रमांक नोंदवल्यास आपल्या अर्जाची सद्यस्थितीही अर्जदाराला आॅनलाईन तपासता येणार असल्याचंही मसूरकर यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा-

खड्डे बुजवण्याचा नवा मंत्र, महापालिका स्वत:च बनवणार कोल्ड मिक्स

धारावी पुनर्विकासातून ७ हेक्टर जागा वगळा, म्हाडाची मागणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा