Advertisement

बांधकामांवर कारवाई, पण हुक्कापार्लर सुरुच!


बांधकामांवर कारवाई, पण हुक्कापार्लर सुरुच!
SHARES

कमला मिलमधील वन अबव्ह व मोजोस बिस्त्रो या पबला लागलेल्या आगीनंतर मुंबईतील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पबवर महापालिकेची धडक कारवाई सुरु आहे. यामध्ये अनधिकृत हॉटेल्स व पबच्या बांधकामांवर कारवाई करण्यात येत असली, तरी यातील हुक्का पार्लर सुरु असल्याची स्पष्ट कबुलीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.


एनओसी नव्हे, ते तर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट!

अग्निशमन दलाच्या वतीने पब आणि हॉटेल्सना एनओसी देण्यात येत असली, तरी प्रत्यक्षात हे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असल्याचे स्पष्टीकरण अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी देत मोठा गोप्यस्फोट केला आहे. त्यामुळे महापालिकेची यंत्रणाच कुचकामी आणि निरर्थक ठरत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.


तीन हुक्का पार्लरवर कारवाई

मुंबई महापालिकेच्या विधी समितीच्या बैठकीत हुक्का पार्लरबाबत विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले. परंतु, या बैठकीत हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे कोणतेही अधिकार महापालिकेला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी प्रशासनाने तीन हुक्का पार्लरवर कारवाई केल्याची माहिती देण्यात आली. परंतु, ज्या हुक्का पार्लरचे बांधकाम तोडण्यात आले आहे, तिथे हुक्कापार्लर सुरु असल्याचीही माहितीही प्रशासनाने दिली आहे. लोअर परळमधील अर्थन रेस्टॉरंट, शीशा, बेलस्टोन आदी हॉटेल्सची बांधकामे तोडण्यात आली असली, तरी त्या ठिकाणी हुक्कापार्लर सुरु असल्याचे सांगण्यात आले.


'...तर अधिकाऱ्यांनी निघून जावे'

यावेळी प्रशासनाने मुंबईत स्वतंत्र धुम्रपान कक्ष (स्मोकिंग झोन) असलेले एकूण ४६ हॉटेल्स आहेत. या सर्वांची यादी सादर केली. यावेळी अग्निशमन दलाने हॉटेल, पबला जी एनओसी दिली जाते, ती प्रोव्हिजनल असल्याचे सांगितले. या माध्यमातून मार्गदर्शक तत्त्वे व सूचना करत असतो, त्याप्रमाणे त्याची काटेकारे अंमलबजावणी करावी, अशी यामागची धारणा असते. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी यावर उत्तर देण्याऐवजी बचावात्मक पवित्रा घेत असल्याने सर्व सदस्यांनी 'या अधिकाऱ्यांना जर उत्तर देता येत नसेल, तर जाण्यास सांगावे', अशी सूचना केली.


'ते रस्त्यावर हुक्का चालवतात का?'

'हॉटेल्सची बांधकामं तोडण्यात आली आहे, पण हुक्कापार्लर चालू आहे, मग ते काही उघड्यावर रस्त्यावर हुक्का चालवतात का?' असा सवाल शिवसेनेच्या शितल म्हात्रेंनी केला. तर, हुक्का पार्लरसंदर्भात विधी समितीची मागील सहा महिन्यांपासून दिशाभूल चालली असल्याचा आरोप करत भाजपाचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी या हुक्का पार्लरवर कारवाई टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी केली.



हेही वाचा

कमला मिल आगप्रकरणी आणखी दहा अधिकाऱ्यांवर ठपका


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा