Advertisement

...तर कचराच उचलणार नाही!


...तर कचराच उचलणार नाही!
SHARES

सुका आणि ओला कचरा स्वतंत्र कचरा पेटीत ठेऊन त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश देऊनही अद्यापही मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायटी आणि वसाहती यांच्याकडून त्यांचे पालन केले जात नाही. या जानेवारी महिन्यापासून महापालिकेने प्रभावी योजना राबवण्यासाठी पाऊल उचलले आहे. गेल्या चार महिन्यात सुमारे 35 हजार नोटीस जारी करूनही प्रत्यक्षात याची दखल लोकांकडून घेतली जात नाही. त्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या सोसायटींचा कचराच न उचलण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे.
मुंबईत दरदिवशी 9 हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या सर्व कचऱ्याची विल्हेवाट देवनार, मुलुंड आणि कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर केली जाते. सध्या क्षमता संपत आली तरीही मुलुंड आणि देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकला जातो, तर कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडवर 3000 मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. तळोजा आणि ऐरोली येथे पर्यायी डम्पिंग ग्राउंड निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ओला कचरा आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण करण्यात यावे, म्हणून मागील 14 वर्षांपासून महापालिकेच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने स्वच्छ भारत योजना राबविण्यात सुरुवात केल्यापासून ही योजना अधिकपणे राबविण्यास सुरुवात केली. परंतु आता देवनार आणि मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात येत असल्यामुळे आणि याबाबत न्यायालयानेही आदेश दिल्यामुळे याची अंमलबजावणी काटेकोरपणे करत आहे. त्यामुळे याअंतर्गत कचरा वर्गीकरण करण्यासाठी नोटीस जारी करण्यात येत आहेत. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत तब्बल 23,161 सोसायटींना नोटीस देण्यात आली आहे. मात्र, या नोटीस जारी केल्यानंतर अद्यापही सोसायटी आणि वसाहतींकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या सोसायटींवर कारवाई केल्याशिवाय पर्याय नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणने आहे. त्यांच्यावर कारवाई करणार नाही. परंतु अशा सोसायटींचा कचरा उचलला जाऊ नये, अशा प्रकारची कारवाई करण्याचा विचार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 20 हजार चौरस मीटर पेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या बांधकामांच्या 'आयओडी'मध्ये अट घालण्यात आली आहे. त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, परंतु ज्यांचे क्षेत्रफळ कमी आहे अशा क्षेत्रफळाच्या सोसायट्यांकडून कचरा वर्गीकरणाची अंमलबजावणी केली जाणार नसेल, नियमानुसार कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

स्वतंत्र कचरापेट्या देऊनही…

कचरा वर्गीकरण करता यावा म्हणून प्रत्येक सोसायटीला 250 लिटरच्या दोन स्वतंत्र कचरा पेट्या देण्यात आल्या आहेत. शिवाय नगरसेवकांच्यावतीने 10 लिटर क्षमतेच्या दोन कचरा पेट्या या ओला आणि सुका कचरा यासाठी वाटप करण्यात आले आहे. याशिवाय मुंबईतील अनेक रस्त्यांवर तसेच रेल्वे स्थानकांवर ओला आणि सुका कचरा टाकण्यासाठी दोन स्वतंत्र कचरा पेट्या ठेवूनही नागरिकांकडून याची दखल घेतली जात नाही.

महापालिकेने दिलेल्या नोटिशीत पाच प्रमुख विभागांची नावे -
एच /पश्चिम (वांद्रे, सांताक्रूझ पश्चिम) : 5328
आर /मध्य (बोरीवली) : 4771
जी/ दक्षिण (प्रभादेवी, वरळी, लोअरपरळ) : 3365
जी/उत्तर (दादर, माहीम, धारावी) : 2345
एच/पूर्व ( वांद्रे ते सांताक्रूझ पूर्व ): 1972

हेही वाचा -

कचरा उचलणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा