जुहू कपासवाडीशेजारील अभिषेक नाल्यावरील झोपड्या साफ


SHARE

मागील अनेक वर्षांपासून जुहू येथील कपासवाडी शेजारील अभिषेक नाल्याला असलेल्या झोपड्यांचा विळखा सोडवण्यास महापालिकेला यश आले आहे. यासर्व अभिषेक नाल्याच्या रुंदीकरणाला अडसर ठरणाऱ्या तब्बल १०८ झोपड्यांवर मंगळवारी बुलडोझर चढवण्यात आला आहे. हा नाला इर्ला पंपिंग स्टेशनला जोडणारा असून याचे रुंदीकरण अनेक वर्षांपासून रखडले होते. पण नाल्याच्या रुंदीकरणातील झोपड्या हटवल्यामुळे आता नाल्यातील पाण्याचा प्रवाहाला गती मिळणार आहे.


या कारवाईमुळे अभिषेक नाल्याचे पात्र मोकळे

अंधेरी आणि जुहू भागातील अभिषेक नाल्याच्या पात्रातील १०८ अनधिकृत बांधकामांविरोधा धडक कारवाई हाती घेत महापालिकेच्या ‘के’पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे अभिषेक नाल्याचे पात्र मोकळे झाले असून यामुळे भविष्यात अंधेरी पश्चिम परिसरातील दादाभाई नौरोजी नगर, न्यू दादाभाई नौरोजीनगर, यासिकनगर, मनिषनगर, चार बंगला परिसर इत्यादी परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.


महापालिका उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत मुंबई पोलीस दलाच्या ८० कर्मचाऱ्यांचा ताफा तसेच महापालिकेचे सुमारे ५८ कामगार-कर्मचारी तसेच अधिकारी सहभागी झाले होते. यासाठी २ जेसीबी यासह इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या