Advertisement

डी. एन. नगर मनपा शाळेचं अनधिकृत बांधकाम तोडलं


डी. एन. नगर मनपा शाळेचं अनधिकृत बांधकाम तोडलं
SHARES

अंधेरी पश्चिमेकडील महापालिकेच्या डी.एन. नगर मनपा शाळेतील ३० हजार चौरस फुटाच्या खेळाच्या मैदानावरील ८ हजार चौ. फूट जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं. शुक्रवारी महापालिकेनं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे बांधकाम हटवत मैदान अनधिकृत बांधकामाच्या विळख्यातून मोकळं केल आहे.


मैदानात अनधिकृत बांधकाम

डी.एन. नगर पोलिस ठाण्याच्या मागे डी.एन. नगर मनपा शाळा आहे. या शाळेला ३० हजार चौ. फुटांचं मोठं खेळाचं मैदान आहे. पण गेल्या काही वर्षांत या खेळाच्या मैदानावरील ८ हजार चौ. फुटावर अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याने मैदान छोटं झालं. विद्यार्थ्यांना खेळण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे या अनधिकृत बांधकामाविरोधात महापालिकेने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाचा निर्णय महापालिकेच्या बाजूनं लागला नि न्यायालयाने या अनधिकृत बांधकामांना दणका दिला.



संरक्षण भिंत उभारणार

न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी महापालिकेच्या परिमंडळ ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम हटवण्याची कारवाई करण्यात आली. हे संपूर्ण अनधिकृत बांधकाम हटवण्यात आल्याची माहिती के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.

अनधिकृत बांधकाम हटवण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना मोठं मैदान उपलब्ध होणार आहे. पुन्हा या मैदानावर अनधिकृत बांधकाम होऊ नये यासाठी मैदानाच्या चारही बाजूनं संरक्षक भिंत बांधण्यात येणार असल्याचंही गायकवाड यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा-

महापालिका कर्मचाऱ्यांना हवाय ४० हजार रुपये बोनस, लवकरच निर्णय होण्याची शक्यता

महापालिका शाळांमध्ये समुपदेशक नेमा; साईनाथ दुर्गे यांची मागणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा