'हॉटेल कॅफे सी फेस'च्या अनधिकृत बांधकामांवर ११ वर्षांनी कारवाई


'हॉटेल कॅफे सी फेस'च्या अनधिकृत बांधकामांवर ११ वर्षांनी कारवाई
SHARES

वरळीतील हॉटेल तवा अर्थातच हॉटेल कॅफे सी-फेसवर अखेर महापालिकेने हातोडा चालवला. २००७ पासून राजकीय आणि इतर क्षेत्रातील वरदहस्ताखाली हे अनधिकृत हॉटेल सुरू होतं. पण ११ वर्षांनी या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने तोडक कारवाई केली.


न्यायालयाने स्थगितीचे आदेश केलं रद्द

वरळी परिसरातल्या खान अब्दुल गफ्फार खान मार्गावर 'वरळी सी-फेस'च्या सुरुवातीलाच सुमारे २ हजार चौरस फुटांच्या जागेत एक अनधिकृत बांधकाम वर्ष २००७ मध्ये करण्यात आलं होतं. या जागेत 'हॉटेल कॅफे सी-फेस' (हॉटेल तवा) हे उपहारगृह होतं. याबाबत न्यायालयाने स्थगितीचे आदेश रद्द केल्यानंतर हे बांधकाम नुकतंच तोडण्यात आलं आहे.


पोलिसांच्या सहकार्याने केली कारवाई

या उपहारगृहाच्या तळमजल्याचा आकार साधारणपणे २ हजार चौरस फूट, तर पहिला मजला हा सुमारे १ हजार ५०० चौरस फूट होता. मुंबई पोलिसांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान हे अनधिकृत बांधकाम आता तोडण्यात आलं असल्याची माहिती जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी दिली आहे.


अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

वरळी डेअरीच्या समोर आणि 'वरळी सी-फेस'च्या पूर्वेकडील भागात असलेल्या या हॉटेलचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यासाठी महापालिकेच्या परिमंडळ - २ चे उपायुक्त नरेंद्र रामकृष्ण बर्डे, 'जी /दक्षिण' विभागाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई पोलिस दलातील ७ कर्मचाऱ्यांचं पथक घटनास्थळी तैनात होते.

यावेळी महापालिकेच्या 'जी/दक्षिण' विभागाचे ४० कामगार - कर्मचारी आणि अधिकारी देखील या अतिक्रमण निर्मूलन कारवाईत सहभागी झाले होते. या कारवाईसाठी १ जेसीबी, वाहने यासह इतर आवश्यक वाहने आणि साधनसामुग्री वापरण्यात आली, अशीही माहिती देवेंद्रकुमार जैन यांनी दिली आहे.

संबंधित विषय