Advertisement

मुंबई महापालिकेत १३८८ चतुर्थ श्रेणी जागांची महाभरती!


मुंबई महापालिकेत १३८८ चतुर्थ श्रेणी जागांची महाभरती!
SHARES

मुंबई महापालिकेत चतुर्थ श्रेणीतील कामगारांची तब्बल आठ वर्षांनी पुन्हा एकदा महाभरती होणार आहे. महापालिकेच्या विविध विभागांतील तब्बल १३८८ जागांसाठी भरती होणार आहे. कामगारांची ही संपूर्ण भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असून राज्य शासन आणि टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेसचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाऑनलाईन लिमिटेड या कंपनीमार्फत होणार आहे.


या विभागात आहे भरती

मुंबई महापालिकेचे जलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण आदी अत्यावश्यक विभागांमध्ये कामगारांची पदे रिक्त असून या सर्व विभागात कामगार, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार आदी वर्गातील १३८८ रिक्तपदे सरळ सेवेने भरली जाणार आहे.


२००९नंतर प्रथमच होतेय भरती

यापूर्वी २००९मध्ये शेवटची कामगारांची पदे भरली गेली होती. त्यावेळी सुमारे एक हजार जागांसाठी तब्बल २ लाख ८९ हजार २४८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतरही पुढील १८ महिने ही भरती प्रक्रिया सुरु होती. त्यानंतर याची प्रतीक्षा यादी महापालिकेने रद्द केली. मात्र अर्ज मागवल्यास मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता लक्षात घेता १३८८ पदांसाठी उमेदवारांची ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून ती नामांकित कंपन्यांमार्फत राबवण्याचे निश्चित केले होते.


आयबीपीएस दिला नकार

ही ऑनलाईन पद्धतीची भरतीप्रक्रिया आयबीपीएस या नामांकित संस्थेमार्फत घेण्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर त्यांनी चतुर्थ श्रेणीतील कामगारांची भरती करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे महाऑनलाईन लिमिटेड या नामांकित संस्थेमार्फत ही प्रक्रिया केली जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी स्पष्ट केले.


४ लाख अर्ज येण्याची शक्यता

या भरतीसाठी सुमारे ४ लाख अर्ज प्राप्त होतील, असा प्राथमिक अंदाज असून यामध्ये खुला प्रवर्ग व मागास तसेच इतर मागास प्रवर्गातून प्रत्येकी २ लाख अर्ज येवू शकतात. त्यामुळे ठाणे महापालिकेमध्ये ज्याप्रमाणे या संस्थेने खुल्या प्रवर्गासाठी ८०० रुपये व मागास व इतर मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी ४०० रुपये शुल्क आकारले होते, तेवढेच शुल्क मुंबई महापालिका उमेदवारांकडून आकारणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. याबाबतची सर्व प्रक्रिया पार पडली असून स्थायी समितीच्या मान्यतेनुसार भरतीबाबतची जाहिरात लवकरच प्रकाशित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.


अशा आहेत १३८८ जागा


खात्यांची नावे
पदांची संख्या
उपजल अभियंता (परिरक्षण)
२६०
उपजल अभियंता (प्रचालने)
३७
उपजल अभियंता (पिसे पांजरापोळ)
४८
उपजल अभियंता (भांडुप संकुल)
२६
उपजल अभियंता (मुंबई प्रकल्प ३ ए)
१८
उपजल अभियंता (बांधकामे)
७६
विभाग कार्यालयातील पाणी विभाग
२७८
मलनि:सारण व प्रचालने
४९६
रुग्णालये (केवळ पाच रुग्णालयांसाठी)
८०
आरोग्य खाते (केवळ स्मशानभूमीसाठी)  
६९हेही वाचा

अशी असेल मुंबई पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा