Advertisement

पालिकेच्या सफाई कामगारांचं कामबंद आंदोलन मागे

शुक्रवारी सकाळपासून कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केलं होतं. बोरीवली, दहिसर भागांत तर बुधवारीच कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू करत कचरा उचलणं बंद केलं होतं.

पालिकेच्या सफाई कामगारांचं कामबंद आंदोलन मागे
SHARES

मुंबई महानगर पालिकेच्या सेवेतील कायमस्वरूपी आणि कंत्राटी सफाई कामगारांचं कामबंद आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलं आहे. सफाई कामगारांच्या मागण्यांचा योग्य तो विचार करत त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानं कामबंद आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे बाबा कदम यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे. सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन तुर्तास मागे घेतल्यानं मुंबईची संभाव्य कचराकोंडीतून सुटका झाली आहे.


सफाई कामगार आक्रमक 

पालिकेनं मुंबईतील कचरा गोळा करून डम्पिंग ग्राऊंडपर्यंत पोहचवण्याचे काम पूर्णपणे कंत्राटदाराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पालिकेत गेल्या कित्येक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर कायमस्वरूपी कामगारांना अन्य विभागांमध्ये सामावून घेतलं जाणार आहे. पालिकेच्या या निर्णयामुळं सफाई कामगारांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून कामगारांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.


तोडग्याचं आश्वासन

शुक्रवारी सकाळपासून कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केलं होतं. बोरीवली, दहिसर भागांत तर बुधवारीच कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू करत कचरा उचलणं बंद केलं होतं. शुक्रवारी मुंबईत कामबंद आंदोलन सुरू झालं आणि मुंबईत कचराकोंडी होण्याची भिती दाट झाली. पण कामगार आणि कामगार संघटनांनी संध्याकाळी उशीरा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि पालिकेच्या उपायुक्तांची भेट घेत आपल्या मागण्या ठेवल्या. त्यावर चर्चा झाली आणि जाधव यांनी कामगारांना कंत्राटी पद्धतीनं कचरा गोळा करून डम्पिंग ग्राऊंडपर्यंत नेण्याच्या निर्णयावर चर्चा करून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. 


समिती स्थापन

कामगारांच्या इतर मागण्यांसाठीही आश्वासन देण्यात आलं असून कामगारांना मुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी एक समितीही स्थापन करण्याचं आश्वासन यावेळी दिलं. त्यानुसार कामगार संघटनेचा एक प्रतिनिधी आणि प्रशासनाचा एक प्रतिनिधी अशी ही समिती असेल आणि ही समिती वर्षभर अभ्यास करत कामगारांना कोणत्या मुलभूत सुविधा पुरवता येतील यावर अभ्यास करणार असल्याचंही बाबा कदम यांनी सांगितलं आहे. जाधव यांच्या आश्वासनानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आलं आहे, मात्र आश्वासनांची पूर्ती केली नाही तर पुन्हा कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशाराही बाबा कदम यांनी दिला आहे. 



हेही वाचा - 

सफाई कामगारांच्या संपामुळे मुंबईकरांची कचराकोंडी?

राणी बागेच्या विस्तारिकरणाचा मार्ग मोकळा, मफतलालची याचिका फेटाळली




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा