Advertisement

पेव्हर ब्लॉक नाहीच, रस्त्यांचे डांबरीकरणच होणार!

मालाड येथील छोट्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी कंत्राट निश्चित झाले असतानाही प्रशासनाने डांबरीकरणाऐवजी या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक लावण्याचा निर्णय घेतला. परंतु, भाजपा आणि शिवसेनेनेही प्रशासनाचा हा डाव उधळून लावत पेव्हरब्लॉकऐवजी हे सर्व रस्ते डांबरीच करण्यास मंजुरी दिली आहे.

पेव्हर ब्लॉक नाहीच, रस्त्यांचे डांबरीकरणच होणार!
SHARES

मालाड येथील छोट्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी कंत्राट निश्चित झाले असतानाही प्रशासनाने डांबरीकरणाऐवजी या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक लावण्याचा निर्णय घेतला. स्थानिक नगरसेविकेला विश्वासात घेऊन प्रशासनाने आपला हा प्रस्ताव पुढेही रेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे छोट्या रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षही तयार झाले. परंतु, भाजपा आणि शिवसेनेनेही प्रशासनाचा हा डाव उधळून लावत पेव्हरब्लॉकऐवजी हे सर्व रस्ते डांबरीच करण्यास मंजुरी दिली आहे.


डांबरीकरण वगळून पेव्हर ब्लॉकचा हट्ट

मालाड येथील छोट्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडण्यात आला होता. परंतु, डांबरीकरण करण्याचे निश्चित असतानाही प्रशासनाने यावर समितीत निवेदन करून हे रस्ते पेव्हरब्लॉकने करण्याचा निर्णय घेतला. स्थायी समिती सदस्या आणि काँग्रेसच्या नगरसेविका कमरजहाँ सिद्दीकी यांनी हे रस्ते छोटे असून त्यावर पेव्हर ब्लॉक बसवणेच योग्य असल्याचे सांगितले. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांचे याबाबतचे धोरण स्पष्ट असून २० फुटांच्या खालील रस्त्यांवर हे पेव्हर ब्लॉक लावता येणार आहेत. यावर प्रशासनाकडूनही रस्ते प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांनी हे रस्ते २० फुटांच्या खाली असल्यामुळे, तसेच हा रस्ता जास्त वर्दळीचा असल्यामुळे तो पेव्हर ब्लॉकचा करणेच योग्य असल्याचे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यापुढे मुंबईच्या रस्त्यांवर पेव्हरब्लॉक लावले जाणार नाहीत, असे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे एकाही रस्त्यावर पेव्हर ब्लॉक लावले जाऊ नये, अशी भूमिका सभागृहनेते यशवंत जाधव, भाजपाचे मनोज कोटक, प्रभाकर शिंदे आणि अभिजित सामंत यांनी घेतली.

मागील स्थायी समितीच्या बैठकीत पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याचा प्रस्ताव फेटाळला गेला होता. असे असतानाही पुन्हा पेव्हरब्लॉकचे रस्ते बनवले जात असतील, तर त्याला आमचा तीव्र विरोध असल्याचे सांगत यापुढे एकही रस्त्यांवर पेव्हर बसवला जावू नये, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी दिला.


बोरीवलीतील 'ते' चार रस्तेही होणार पेव्हरऐवजी डांबरी!

मालाडमधील डांबरी रस्त्यांऐवजी पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनवायला निघालेल्या प्रशासनाचा डाव उधळून लावल्यानंतर बोरीवलीमधील ९ छोट्या रस्त्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला. यामध्ये ४ रस्ते पेव्हरचे, तर ५ रस्ते डांबरीकरणाचे होते. भाजपाचे मनोज कोटक यांनी उपसूचनेद्वारे हे पेव्हरचे रस्ते डांबरी करावेत आणि त्यांच्या वाढीच्या खर्चाचा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी केली. याप्रमाणे हा प्रस्ताव मंजूर करून बोरिवलीमधील पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांचेही डांबरीकरणच करण्याचा निर्णय घेण्यात आला.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा