Advertisement

घोडपदेवच्या ‘चायना’ इमारतीवर महापालिकेचा हातोडा


घोडपदेवच्या ‘चायना’ इमारतीवर महापालिकेचा हातोडा
SHARES

भायखळा घोडपदेव येथील हिराबाई कंपाऊंडमधील सात मजली चायना इमारतीवर मंगळवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हातोडा चालवला. ही इमारत अनधिकृत होती. न्यायालयाने यावरील स्थगिती उठवल्याने महापालिकेने यामधील रहिवाशांना बाहेर काढून कारवाईला सुरुवात केली. ही संपूर्ण इमारत लोडबेअरिंगची आहे.



न्यायालयाचे बिल्डरविरोधात आदेश

मुंबई महापालिकेच्या 'ई' विभागात घोडपदेव परिसरात असणाऱ्या ‘हिराबाई कंम्पाऊंड’मधील भूखंड क्रमांक ७ वर ‘चायना’ या नावाची ७ मजली अनधिकृत इमारत २०१३ मध्ये बांधली होती. सुमारे ७०० चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर 'चायना' ही इमारत बांधली होती. या इमारतीमध्ये ७२ सदनिका तसेच तळमजल्यावर ३ दुकाने आहेत. आलेल्या तक्रारीनुसार या अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिकेच्या ‘इ’ विभाग कार्यालयाने हाती घेतली होती. महापालिकेने पाठवलेल्या या नोटीसला विकासकाने शहर दिवाणी न्यायालयात आव्हान दिले. परंतु न्यायालयाने ५ फेबुवारी रोजी ही याचिकाच फेटाळत विकासकाविरोधात आदेश दिला.


संपूर्ण भूखंड मोकळा करणार

या इमारतीबाबत न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर उपायुक्त सुहास करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करण्यात आली. विशेष कारवाई मंगळवारी मुंबई पोलिसांच्या विशेष सहकार्याने तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त दिलीप शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी या कारवाईला सुरुवात झाली. पुढील २ दिवसांत हा भाग पूर्णपणे तोडून भूखंड मोकळा करण्यात येईल, अशी माहिती ‘ई’ विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी दिली आहे.



७५ पोलिसांचा ताफा घटनास्थळी

ही इमारत अत्यंत चिंचोळ्या मार्गावर असल्याने या ठिकाणी बुलडोजर, जेसीबी यासारखी यंत्रसामुग्री नेणे शक्य नव्हते. ज्यामुळे हे काम मजुरांच्या व गॅस कटरच्या सहाय्याने करण्यात येत आहे. या कामासाठी तोडकाम करणाऱ्या कंत्राटदाराच्या ५० मजुरांसह महापालिकेचे १० कर्मचारी कार्यरत होते. यावेळी भायखळा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिंगोटे यांच्या नेतृत्वाखाली ७५ पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून या ताफ्यात २३ महिला पोलिसांचाही समावेश करण्यात आला होता, असेही साहेबराव गायकवाड यांनी सांगितले.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा