Advertisement

लाखाची मशीन, कोट्यवधीची देखभाल; मलवाहिन्यांच्या साफसफाईतील मशीन खरेदीत घोटाळा


लाखाची मशीन, कोट्यवधीची देखभाल; मलवाहिन्यांच्या साफसफाईतील मशीन खरेदीत घोटाळा
SHARES

मलनि:सारण खात्यामार्फत वाहनांवर बसवलेल्या सात सक्शन मशीनची खरेदी केली जात आहे. पण या सर्व मशीनची खरेदी पावणे २ कोटी रुपयांना केली जात असली तरी याच्या वार्षिक देखभालीवर पहिल्याच वर्षी सुमारे तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे या कंत्राटासाठी केवळ दोनच कंपन्या पुढे आल्या होत्या. त्या दोघांना कामे विभागून देत पुढील आठ वर्षांसाठी या दोन्ही कंपन्यांना सुमारे ४० कोटी रुपयांचा खर्च देखभालीवर केला जाणार आहे. त्यामुळे लाखाची मशीन आणि कोट्यवधीची देखभाल अशी अवस्था असून एकप्रकारे कंत्राटदाराला मदत करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याची बाब समोर येत आहे.

मलनि:सारण खात्यामार्फत शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील मुख्य मलवाहिन्यांच्या जाळ्यांची सफाई केली जाते. ही सफाई वाहनांवर बसवलेल्या यंत्रामार्फत केली जाते. या यंत्राच्या मदतीने मलवाहिन्यांच्या मॅनहोल्समधील अर्थात मनुष्यप्रवेश असलेल्या जाळ्यांच्याठिकाणातून साचलेला गाळ बाहेर काढला जातो. अरुंद गल्लीबोळातून जाणाऱ्या मलवाहिन्यांच्या सफाई करता मोठ्या आकाराच्या आणि जास्त क्षमतेच्या वाहनावर बसवलेल्या सक्शन मशीनचा वापर करता येत नाही.


अशा मलवाहिन्यांची सफाई करण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. अशाप्रकारे गल्लीबोळातून जाणाऱ्या मलवाहिन्या २३० आणि ४०० मि. मी व्यासाच्या आहेत. त्यासर्वांची खोली ही दोन ते तीन मीटर एवढी असते. त्यामुळे या मलवाहिन्यांच्या सफाईसाठी वाहनांवर बसवलेल्या १.५ घनमीटर क्षमतेच्या सक्शन मशीनचा पुरवठा करून त्याचे ८ वर्षे कालावधीसाठी देखभाल आणि दुरुस्तीचे कंत्राट देण्यात येत आहे.


मशिनीच्या देखभालीसाठी इतका खर्च

महापालिकेने काढलेल्या निविदांमध्ये शहर भागासाठी हिंदुस्थान इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीकडून ४ वाहनांवर आधारीत यंत्रांची खरेदी केली जाणार आहे. २४ लाख ७५ हजार रुपये याप्रमाणे या चार मशिनसाठी ९९ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. ही मशीन खरेदी केलेल्या कंत्राटदाराला पुढील आठ वर्षांची देखभाल आणि दुरुस्तीचे कंत्राट दिलं जाणार आहे. त्यामुळे या चारही मशीनकरता पहिल्या वर्षी १.५७ कोटी रुपयांचा खर्च या देखभालीसाठी केला जाणार आहे आणि आठव्या वर्षांपर्यंत हा खर्च २.८७ कोटींच्या घरात जाणार आहे. त्यामुळे या मशीनचा पुरवठा आणि देखभाल यासाठी यावर १९. २४ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.


देखभालीचं कंत्राट या कंपनीला

तर पूर्व उपनगरासाठी मेसर्स आयपीडब्ल्यूटी कार्पोरेशन या कंपनीकडून प्रत्येकी २४ लाख ५० हजार रुपयांमध्ये तीन मशीनची खरेदी केली आहे. यासाठी ७३ लाख ५० हजार रुपयांचा खर्च होणार आहे. तर या तिन्ही मशिनच्या आठ वर्षांच्या देखभालीचं कंत्राट याच कंपनीला देण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या वर्षी १.२७ कोटी रुपये तर आठव्या वर्षी २.१६ कोटी रुपये याप्रमाणे आठ वर्षांमध्ये या कंपनीला देखभालीसाठी १३.७६ कोटी रुपये मोजले जाणार आहे.
विशेष म्हणजे या निविदेमध्ये दोनच कंपन्यांनी भाग घेऊनही त्यांना विभागून कामे देण्यात आली. पण मशीनच्या खरेदीमध्ये सुमारे प्रत्येकी २४ हजार रुपयांचा मोठा फरक आहे. याशिवाय पाळ्यांसाठी आकारण्यात येणारा दरही भिन्न असल्यामुळे यामध्ये कंत्राटदाराला मदत करत अधिकाऱ्यांकडून मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याची बाब समोर येत आहे.


रवी राजा यांचा विरोध

याला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी तीव्र विरोध केला असून या दोन कंपन्यांनी संगनमत करूनही कामे मिळवली आहे. पण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही त्यांना मदत केलेली आहे. लाखाच्या मशीनकरता कोट्यवधीचा देखभालीवर होणारा खर्च हा थक्क करणारा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनीही याला विरोध दर्शवत एकच मशीन दोन वेगळ्या कंत्राटदारांकडून वेगवेगळ्या दरात कशी काय खरेदी केली जाते, असा प्रश्न केला आहे. शिवाय पाळ्यांच्या दरातही मोठा फरक असल्यामुळे यामध्ये मोठा घोटाळा असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा