Advertisement

मुंबईतील खासगी रुग्णालयांतील अग्निसुरक्षा यंत्रणेची होणार तपासणी

मुंबई महापालिकेन तातडीनं शहरातील खासगी रुग्णालयांतील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील खासगी रुग्णालयांतील अग्निसुरक्षा यंत्रणेची होणार तपासणी
SHARES

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या विशेष दक्षता विभागाला (SNCU) लागलेल्या आगीत १० चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, ७ बालकांना वाचवण्यात यश आलं आहे. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर खडबडून जागं झालेल्या मुंबई महापालिकेन तातडीनं शहरातील खासगी रुग्णालयांतील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. अग्निशमन दलामार्फत सोमवारपासून मुंबईतील खासगी रुग्णालयांच्या तपासणी सुरू करण्यात येत आहे.

त्रुटी आढळणाऱ्या रुग्णालयांवर नोटीस बजावण्यात येणार आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये १० बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांतील रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिका प्रशासनानं शहरातील सर्व लहान-मोठ्या खासगी रुग्णालयांतील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्याचे आदेश अग्निशमन दलाला दिले आहेत.

खासगी रुग्णालयांमध्ये सोमवारपासून तपासणी सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महापालिकेच्या नायर, केईएम, शीव रुग्णालयांमध्ये नियमितपणे अग्निसुरक्षा तपासणी केली जाते. त्याचा अहवाल वेळोवेळी सादर केला जातो. मात्र पुन्हा एकदा पालिका रुग्णालयांतील अग्निसुरक्षेच्या तपासणीची उजळणी करण्यात येणार आहे.

खासगी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा यंत्रणेत त्रुटी आढळल्यास तात्काळ व्यवस्थापनावर नोटीस बजावण्यात येणार आहे. यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी व्यवस्थापनाला काही दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. मुदतीत त्रुटी दूर न केल्यास संबंधित रुग्णालयाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा