Advertisement

मुंबईतील 74,000 मॅनहोल्सवर स्टेनलेस स्टील ग्रिल बसवणार : BMC

त्याची प्रतिकृती (प्रोटोटाईप) देखील तयार करण्यात आली आहे.

मुंबईतील 74,000 मॅनहोल्सवर स्टेनलेस स्टील ग्रिल बसवणार : BMC
(File Image)
SHARES

मुंबईतील पर्जन्य जल, मलनिसारण व इतर सेवांसाठी असलेल्या वाहिन्यांवरील प्रवेशमार्ग अर्थात मॅनहोल्सशी निगडित दुर्घटना टाळण्‍यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या प्रवेशिकांमध्ये मजबूत अशा संरक्षक जाळ्या बसविण्याचा निर्णय घेतला  आहे.

त्याची प्रतिकृती (प्रोटोटाईप) देखील तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीनुसार मुंबईतील सर्व मॅनहोल्स मध्ये या जाळ्या टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार असून त्यादृष्टीने लवकरच कार्यवाही सुरु होणार आहे.  

मुंबई महानगरात पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिसारण वाहिन्यांचे मोठे जाळे आहे. या वाहिन्यांची स्वच्छता, देखभाल व दुरुस्तीसाठी त्यामध्ये शिरण्याचा प्रवेशमार्ग (मॅनहोल्स) असतो. या मॅनहोल्सवर झाकण लावलेले असते, जेणेकरुन त्यामध्ये मनुष्य अथवा प्राणी किंवा वाहन आदी पडू नयेत.

मात्र बऱ्याचदा  या मॅनहोल्सची झाकणे नागरिकांनी परस्पर काढल्याची किंवा प्रसंगी ही झाकणे चोरीला जाण्याच्या घटना घडतात व त्यातून अपघात / दुर्घटना घडतात. यावर उपाययोजना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे, मॅनहोल्‍सना संरक्षक जाळ्या बसविण्‍यासंदर्भात माननीय उच्च न्यायालयाने देखील महानगरपालिकेला सूचना केली आहे. 

महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मॅनहोल सर्वेक्षणासाठी विशेष सूचना अलीकडे दिल्या होत्या. तसेच, मॅनहोल्स आणि चेंबर्सच्या ठिकाणी सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश आयुक्त श्री. चहल यांनी दिले आहेत.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी देखील विशेष बैठक बोलावून नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता, अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना म्हणून सर्व मॅनहोल्समध्ये मजबूत अशी संरक्षक जाळी बसवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासोबतच संरक्षक जाळ्यांची प्रतिकृती अर्थात प्रोटोटाईप विकसित करण्याचेही निर्देश त्यांनी दिले होते. 

संरक्षक जाळ्यांसाठी याआधी डक्टाईल धातूचा वापर करण्यात आला होता. आता नवीन प्रोटोटाईपमध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

संरक्षक जाळ्यांचे ग्रीलचे डिझाईन आणि प्रत्यक्षात येणारा खर्चाचा अंदाज ठरविण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. लवकरच संरक्षक जाळ्यांच्या बाबतीत निविदा प्रक्रियेलाही सुरूवात होणे अपेक्षित आहे.

तसेच, संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात टप्पेनिहाय पद्धतीने मॅनहोलवर जाळी बसविण्याची कार्यवाही यंदाच्या पावसाळ्यातच सुरु करुन पुढील पावसाळा सुरु होण्यापूर्वीच पूर्ण करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. 



हेही वाचा

BMCची जुन्या उड्डाणपुलांवर साऊंड बॅरियर लावण्याची योजना

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा