SHARE

मुंबई महापालिका मृत प्राण्यांचं दहन करण्याकरीता महालक्ष्मी, मालाड आणि देवनार अशा ३ ठिकाणी स्मशानभूमी उभारणार आहे. या स्मशानभूमीत मृत कुत्रे, मांजर आणि पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यात येईल. प्राण्यांसाठी स्मशानभूमी उभारणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. 

महालक्ष्मी इथं टाटा ट्रस्टच्या माध्यमातून दहनभट्टी उभारण्यात येईल, तर मालाड व देवनार येथील स्मशानभूमी बनवण्यासाठी लंडनमधील अनिथा टेक्सकॉट कंपनीची निवड करण्यात आली आहे.

दहनभट्टी बंधनकारक

‘प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा’ १९६० आणि प्राणी जनन नियंत्रण नियमावली २००१ अन्वये स्थानिक प्रशासनाने प्राण्यांसाठी दहनभट्टीची व्यवस्था करणं बंधनकारक केलं आहे. त्यानुसार शहर आणि उपनगरात दहनभट्टी उभारण्यात येणार आहे. त्यानुसार महालक्ष्मी, मालाड व देवनार इथं उभारण्यात येणाऱ्या स्मशानभूमीतील दहनभट्टी ‘पीएनजी’ गॅसवर आधारित असेल. यामुळे मृत प्राण्यांची क्षणार्धात विल्हेवाट लावली जाऊन दुर्गंधी तसंच रेबीजसारख्या जीवघेण्या आजारांना आळा घालणं शक्य होणार आहे. 

'या' संस्थांकडे काम

सद्यस्थितीत परळ इथं एका स्वयंसेवी संस्थेद्वारे पाळीव प्राण्यांसाठी खाजगी अंत्यसंस्कार स्थळ चालवण्यात येतं. तर महापालिका क्षेत्रातील भटक्या जनावरांच्या मृतदेहाची विल्हेवाट बोरिवलीतील 'कोरा केंद्र' या स्वयंसेवी संस्थेद्वारे लावली जाते. 

मालाड येथील गुरांचा कोंडवाडा इथं ५० केजी/एच आर आणि देवनार इथं ५०० केजी/एचआर क्षमतेच्या दहनभट्टय़ा बसवण्यात येतील. या दहनभट्टय़ा उभारण्यासाठी मे. अनिथा टेक्सकॉट (इंडिया) प्रा. लि.ला कंत्राट देण्यात येणार आहे. या कामासाठी १७ कोटी ८० लाख २९ हजार ४५३ रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. 


हेही वाचा-

हाऊसिंग सोसायट्यांमध्येही ‘पे अॅण्ड पार्क’? महापालिका आयुक्तांनी दिले आदेश

गुरूवारी ‘या’ भागात होणार पाणीकपातसंबंधित विषय
ताज्या बातम्या