Advertisement

पालिकेच्या स्मशानभूमींचंही खासगीकरण, स्वच्छतेचं काम खासगी कंत्राटदारांना


पालिकेच्या स्मशानभूमींचंही खासगीकरण,  स्वच्छतेचं काम खासगी कंत्राटदारांना
SHARES

मुंबई महापालिकेची रुग्णालयं, इमारत तसेच शाळांच्या हाऊस किपिंगचं काम खासगी कंपन्यांना दिल्यानंतर अाता पालिकेच्या स्मशानभूमींचंही खासगीकरण केलं जाणार आहे. या स्मशानभूमींच्या स्वच्छतेसाठी खासगी कंत्राटदार कंपन्यांना नियुक्त करण्यात येत आहे. आजवर महापालिकेच्या कामगारांमार्फत स्मशानभूमींतील स्वच्छता केली जायची. परंतू, यासाठी कामगारांची भरती न करता खासगी कंपन्यांकडून ही साफसफाई करून घेतली जाणार आहे.


एकच कंपनी पात्र

मुंबई महापालिकेच्या स्मशानभूमींमध्ये अस्वच्छता असल्यामुळे येथे स्वच्छता राखल्यास या ठिकाणी येणाऱ्या दु:खी माणसांच्या मनाला शांती मिळेल, असा दावा करत महापालिकेने  स्मशानभूमींची स्वच्छता खासगी कंपनीमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खासगी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे. शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगराचे दोन भाग अशाप्रकारे ४ भागांमध्ये विभागून निविदा काढण्यात आली. मात्र, या चारही भागांमध्ये ४६ स्मशानभूमींची स्वच्छता राखण्यासाठी केएचएफएम हॉस्पिटॅलिटी फॅसिलिटी मॅनेजमेंट ही एकच कंपनी पात्र ठरली आहे. एका वर्षाकरता या स्वच्छतेवर १३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.


रिक्त जागाही भरणार

मुंबई महापालिकेच्या शाळांची स्वच्छता राखण्यासाठी अशाचप्रकारे एका वर्षाकरता कंत्राट देण्यात आलं. त्यानंतर शाळांच्या हाऊस किपिंगचं काम खासगी संस्थांकडून करून घेत खासगीकरण केल्यानंतर आता स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठीही खासगी कंपनीची निवड करण्यात येत आहे. महापालिकेच्यावतीनं १३८८ कामगारांसाठी घेण्यात आलेल्या परिक्षांमध्ये स्मशानभूमीतील कामगारांचाही समावेश आहे. त्यामुळे एका बाजूला कामगारांच्या रिक्त जागा भरल्या जात असतानाच दुसरीकडे खासगीकरण करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे.


अपुरं मनुष्यबळ

स्मशानभूमीत अपुरे मनुष्यबळ उपलब्ध असल्याने स्वच्छतेवर परिणाम होतो. त्यामुळे येथील स्वच्छता खासगी कंपनीच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर यांनी दिली.  स्मशानभूमीचं क्षेत्रफळ मोठं असल्यामुळे बऱ्याचदा अपुऱ्या कामगारांमध्ये ते स्वच्छ राखलं जात नाही. म्हणून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.



हेही वाचा - 

मुख्यमंत्र्यांना मिळणार नवीन हेलिकाॅप्टर

एका उंदरामुळे मिळाली १९ हजारांची नुकसान भरपाई




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा