Advertisement

आता महापालिकेचा आरोग्य परवाना पाच वर्षांसाठी


आता महापालिकेचा आरोग्य परवाना पाच वर्षांसाठी
SHARES

मुंबईतील हॉटेल्स अन्य खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा परवाना बंधनकारक आहे. या परवान्याचे नुतनीकरण दरवर्षी करणे आवश्यक असते. परंतु आता हा परवाना पाच वर्षांसाठी दिला जाणार आहे. अर्जदाराला पाच वर्षांचे एकत्र शुल्क भरून या परवान्याचे नुतनीकरण करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी नुतनीकरण करण्याच्या त्रासातून हॉटेल व्यावसायिकासह सर्वांची सुटका होणार आहे.


परवाना प्रक्रिया ऑनलाईन

महापालिका अधिनियम कलम ३९४ अंतर्गत उपहारगृहे, बेकरी, खाद्यपदार्थ विक्रेते, लॉज, पिठाची गिरणी, तेल-तूप विक्रेते यासारख्या विविध ३५ व्यवसायांसाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचा आरोग्य परवाना (हेल्थ लायसन्स) आवश्यक असतो. आजवर हा परवाना एक वर्षाकरता दिला जायचा. पण आता तो पाच वर्षांसाठी दिला जाणार आहे. आरोग्य परवान्यासाठी करायची अर्ज प्रक्रिया आता अधिक सुधारणांसह ऑनलाईन करण्यात आली आहे. त्या अंतर्गत हा परवाना पाच वर्षांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


कसा कराल परवान्यासाठी अर्ज?

आरोग्य परवान्यासाठी ऑनलाईन प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये अर्जदाराने अर्ज केलेल्या दिवसापासून कार्यालयीन कामकाजाच्या किमान २० दिवसात ते जास्तीतजास्त ३० दिवसात आरोग्य परवाना मिळणे शक्य होणार आहे. मुंबई महापालिकेच्या portal.mcgm.gov.in (www.mcgm.gov.in) या संकेतस्थळावरील ऑनलाईन सेवा (ऑनलाईन सर्विसेस) या लिंकमध्ये 'New Business Application'वर क्लिक केल्यानंतर उघडणाऱ्या पानावरच ऑनलाईन अर्ज असून तो ऑनलाईन पद्धतीनेच सबमिट करता येतो.


अर्जानंतर होणार तपासणी

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून करावयाच्या अटींची पूर्तता अर्जदार करेल. या अटींच्या पूर्ततेबाबत मुंबई अग्निशमन दलामार्फत स्वतंत्रपणे तपासणी केली जाईल. तसेच महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत तपासणी केली जाईल. इमारतीच्या बांधकामाबाबत तसेच इतर बाबींची तपासणी ही महापालिकेच्या ‘इमारत व कारखाने’ (Building & Factories) या खात्याद्वारे करण्यात येईल.


अर्ज वैधता ३० दिवसांची

या पद्धतीने केलेल्या ऑनलाईन अर्जाची वैधता ही जास्तीतजास्त कार्यालयीन कामकाजाच्या ३० दिवसांची असून या कालावधीत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास सदर अर्ज प्रक्रिया आपोआप रद्द होईल. अर्जाशी संबंधित सर्व प्रक्रियांबाबत कालमर्यादेचे बंधन असून जसे महापालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना लागू आहे, तसेच ते अर्जदारास देखील लागू आहे. या कालावधीत अर्ज प्रक्रिया पूर्ण न झाल्यास अर्जदाराला पुन्हा नवीन अर्ज करावा लागेल.



हेही वाचा

अँजिओप्लास्टीचा 'तो' व्हायरल व्हिडिओ खोटा, जे. जे. हॉस्पिटलचा खुलासा


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा