Advertisement

पालिकेनं करून दाखवलं! लाटांचा २०० मेट्रिक टन कचरा साडेतीन तासांत साफ


पालिकेनं करून दाखवलं! लाटांचा २०० मेट्रिक टन कचरा साडेतीन तासांत साफ
SHARES

पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या उंच-उंच लाटांनी अाता थेट चौपाटीपलीकडे रस्त्यांवर धाव घेतली अाहे. त्यामुळे लाटांबरोबर समुद्रातील कचराही अाता रस्त्यांवर फेकला जात अाहे. दुपारची भरती संध्याकाळी अोसरल्यानंतर महापालिकेचे अधिकारी व कामगारांनी कचरा साफ करण्याची मोहिम फत्ते करून दाखवली तीसुद्धा अवघ्या साडेतीन तासांत. या कर्मचाऱ्यांनी पुन्हा रस्ते आणि चौपाट्या चकाचक करून टाकल्या. शनिवारी या लाटांमुळे आलेला तब्बल २०० मेट्रिकपेक्षाही अधिक कचरा उचलण्यात आला.


४.९६ मीटर उंचीची भरती

समुद्राला शनिवारी दुपारी एकच्या सुमारास ४.९६ मीटर उंचीची भरती होती. त्यामुळे समुद्राला येणाऱ्या लाटा थेट चौपाटीपलिकडे रस्त्यांवर येऊन आदळत होत्या. त्यामुळे समुद्रातील सर्व कचरा थेट रस्त्यांवर पडला होता. हा जमा झालेला कचरा महापालिकेच्या संबंधित विभागाच्या कामगारांच्या मदतीनं तसेच चौपाट्यांवरील कचरा नेमणूक केलेल्या कंत्रादारांकडून साफ करण्यात आला.



गिरगाव चौपाटीवर कचरा

मरिन लाईन्ससह गिरगाव चौपाटीवर मिळून सुमारे १२ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. शुक्रवारी या दोन्ही ठिकाणांवर मिळून ९ मेट्रिक टन कचरा उलण्यात आला होता. यासाठी मरिन ड्राईव्हला ए विभागाचे २० कामगार तर गिरगाव चौपाटीवर सी विभागाचे ३५ कामगार अशाप्रकारे ५५ कामगारांच्या मदतीने हा कचरा उचलण्यात आल्याची माहिती ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर व सी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील सरदार यांनी दिली आहे.


दादर चौपाटीवर १० मेट्रिक टन कचरा

दादर शिवाजीपार्क चौपाटीवरून तब्बल १० मेट्रिक टन कचरा उचण्यात आला. समुद्रातील लाटांबरोबरच हा सर्व कचरा चौपाटीवरच जमा झाला होता. तर काही प्रमाणात चौपाटीच्या बाहेर पाण्याबरोबरच रस्त्यावर आला होता. हा सर्व कचरा २० कामगारांच्या मदतीनं साफ करण्यात आल्याची माहिती जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांनी दिली आहे.



जुहू चौपाटीवर १५० कामगार

जुहू चौपाटीवरही समुद्राच्या उंच लाटांबरोबरच कचरा चौपाटीबरोबर बाहेर फेकला गेला होता. या चौपाटीच्या सफाईसाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. दीडशे कामगारांच्या मदतीने येथील कचरा साफ करण्यात आला असून तब्बल ११० मेट्रिक टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. याबरोबरच वरळी सी-फेस, गोराई, मनोरी, आक्सा, चिंबई आदी चौपाट्यांवरही लाटांबरोबर आलेला कचरा उचलून अवघ्या काही तासांमध्येच सर्व परिसर पुन्हा चकाचक करण्यात आला. त्यामुळे तब्बल २०० मेट्रिक टनापेक्षाही जास्त कचरा उचलण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली आहे.



हेही वाचा -

ते पाच दिवस…

हवामानाचा अचूक अंदाज मिळणार, मुंबईत येणार नवं डाॅपलर रडार!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा