ओला, सुका कचरापेट्या वाटपात फसवणूक

 Pali Hill
ओला, सुका कचरापेट्या वाटपात फसवणूक

मुंबई : घरोघरी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण होऊन ओला व सुका कचरा वेगळा ठेवता यावा यासाठी घराघरांमध्ये दोन स्वतंत्र कचऱ्याचे डबे देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार नगरसेवक निधीतून दोन डबे देण्याचा निर्णय घेऊनही प्रत्यक्षात नगरसेवकांनी मात्र प्रत्येक कुटुंबांना केवळ एकच डबा दिला. यामुळे ओला आणि सुका कचऱ्याच्या डबे वाटपात नागरिकांची निव्वळ फसवणूक सर्वच पक्षांच्या नागरसेवकाकडून झालेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियांनंतर्गत ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून यानुसार नगरसेवक निधीतून १० लिटर क्षमतेचे कचऱ्याचे डबे खरेदी करण्याचे घनकचरा व्यवस्थापन ठरविले. यासाठी प्रथम ३ लाख कचरा पेट्यांची खरेदी मागील वर्षी करून प्रथम ओला व सुका कचऱ्यासाठी दोन स्वतंत्र डब्याचे वाटप विभागातील नागरिकांना करण्यात आले होते. पण त्यानंतर मागील सहा महिन्यांपूर्वी १० लाख कचऱ्यांच्या डब्यांची खरेदी करण्यात आली. निलकमल कंपनीला या कचऱ्याचे डबे पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले. त्यांनुसार कचऱ्याच्या डब्याचा पूरवठा करण्यात आला. प्रत्येक नगरसेवकाला प्रत्येकी सरासरी साडे चार हजार डबे देण्यात निश्चित करून त्याप्रमाणे नगरसेवकांना हे डबे वाटण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परंतु नगरसेवकांना देण्यात आलेल्या या डब्यातील प्रत्येक कुटुंबाला ओला व सुका कचरा यासाठी दोन स्वतंत्र  डबे देणे अपेक्षित होते. पण प्रत्येक्षात दोन डबे न देता केवळ एकाच डब्याचे वाटप नागसेवकांनी घरोघरी जाऊन केले.

नगरसेवक निधीतून खरेदी करण्यात आलेल्या  १० लिटलच्या कचऱ्याचे डबे हे प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी दोन द्यायला हवे होते, पण तसे होत नाही. मुळात हे कंत्राट एकाच कंपनीला देण्यात येत असल्यामुळे ही कंपनी आचारसंहितेपुर्वी डब्याचा पुरवठा करू शकणार नाही, म्हणून आपण उपसूचना मांडून ३ कंपन्यांना विभागून हे काम द्यावे अशी मागणी केली होती. पण ती उपसूचना मान्य न केल्यामुळे एकाच कंपनीला काम देण्यात आले व ही कंपनी वेळेत या डब्याचा पुरवठा करू शकलेली नाही. त्यामुळे हे डबे मिळाले त्यातील एकेक डब्याचे वाटप नगरसेवकांनी केले आहे, असे मला वाटते, असे भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक नगरसेवकांनी डब्यांची जोडी मागितली आहे, त्याप्रमाणे त्यांना चार ते पाच हजार डब्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे डब्यांच्या जोडीचा पुरवठा व्हायला हवा, असे महापालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त विजय बालमवार यांनी सांगितले.

Loading Comments