शेतकर्यांसाठी ई -पीक पाहणी मोबाईल अप्लिकेशनचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी ई-पीक पाहणी अॅप्लीकेशनच्या प्रचार प्रसिद्धीसाठी ‘प्रभारंग फिल्म्स्’ ने तयार केलेल्या माहितीपटाचं अनावरणही मुख्यमंत्र्यांचं हस्ते करण्यात आलं.
राज्यात स्वातंत्र्यदिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची माहिती स्वत:च सरकारकडे नोंदवणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादासाहेब भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी उपस्थित होते. तसेच सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देखील या सोहळ्यात ऑनलाईन सहभागी झाले होते.
माहितीपट बनवण्यासाठी आपण घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना प्रभारंगचे दिग्दर्शक संदीप पांडुरंग माने यांनी यावेळी व्यक्त केली. राज्याच्या ऐतिहासिक क्षणांत आमचंही नाव कोरलं गेलं. महसूल व वन विभागाच्या राज्यभरातील सर्व अधिकार्यांनी या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होत हा माहितीपट पाहिला आणि तत्परतेनं मेसेज फोनद्वारे फीडबॅक देऊन कौतुकाची पोचपावतीही दिल्याचं संदीप माने यांनी म्हटलं.
हा माहितीपट बनवण्यासाठी संहिता लेखक आणि निर्मिती प्रमुख उर्मिला चोपडा-हिरवे, छायाचित्रकार अमेय चव्हाण, सहाय्यक छायाचित्रकार शरद डहाळे, ड्रोन छायाचित्रकार नितीन हिरडे, संगीतकार पार्थ उमराणी, निवेदक अनिरुद्ध दडके आणि संकलक युवराज ब्राह्मणीकर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं.