३५ वर्षांपेक्षा अधिक काळ टिकणारे पूल बांधा- मुख्यमंत्री

मुंबईतील अनेक पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद असल्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सर्व यंत्रणांची बुधवारी बैठक बोलावली होती

SHARE

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी) येथील हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेनं मुंबईतील जुने- धोकादायक पूल दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिकेनं मुंबईतील २९ पूल दुरुस्ती किंवा पुनर्बाधणीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, रेल्वेनं देखील १९९ पादचारी पूल आणि वाहतुकीच्या पुलांच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. मात्र, एकाचवेळी मुंबईतील अनेक पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद असल्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना वाहतूक कोंडीच्या मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सर्व यंत्रणांची बुधवारी बैठक बोलावली होती.

अनेक अधिकारी उपस्थिती

या बैठकीला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशीष शेलार, राज पुरोहित, अमित साटम, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. . राजीव, पोलीस आयुक्त संजय बर्वे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्यासह मध्य रेल्वेचे मंडल महाप्रबंधक संजयकुमार जैन आणि पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अनिल गुहा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अनेक पूल बंद

मुंबईत एकूण ३४४ पूल असून, त्यामधील ३१४ पूल महापालिकेच्या, तर ३० पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात आहेत. यातील २९ पूल स्ट्रक्टर ऑडिटनुसार बंद करण्यात आले आहेत. ९२ पूल सुस्थितीत असून, ११६ पुलांची किरकोळ तर ६७ पुलांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात येत आहे. मध्य रेल्वेमार्फत १९९ पुलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. गेल्या ५ वर्षात मध्य रेल्वेमार्फत ६८, तर पश्चिम रेल्वेमार्फत ३२ पादचारी पूल नव्यानं बांधण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

मोबाइल अ‍ॅप

या बैठकीत पादचारी, वाहतूक आणि रेल्वे पुलांचे बांधकाम ३० ते ३५ वर्षांपेक्षा अधिक राहण्यासाठी अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना मुंख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाला केली. सध्या ज्या भागातील पूल, रस्ते वाहतुकीस बंद आहेत त्याबाबत व पर्यायी मार्गाची माहिती देण्यासाठी मोबाइल अ‍ॅप तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

वाहतुकीची कोंडी

ज्या भागात वाहतुकीची कोंडी निर्माण होते, त्या भागात ठरावीक अंतरावर वाहनतळाची व्यवस्था करावी. तेथून नागरिकांना जाण्यासाठी पर्यायी वाहतुकीची सुविधा निर्माण करावी. गर्दीच्या ठिकाणी खासगी वाहनांना प्रवेश देऊ नये, आवश्यकता भासल्यास ‘बेस्ट’ बसच्या प्रवासात सवलत देण्याचा विचार करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.हेही वाचा -

मिलिंद देवरा करणार मुंबईतील नालेसफाईची पाहणी

दहावीच्या घसरलेल्या निकालाबाबत आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेटसंबंधित विषय
ताज्या बातम्या