Advertisement

कामगारांसाठी ‘पॉईंट टू पॉईंट’ वाहूतक व्यवस्था उभारा- उद्धव ठाकरे

जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरु राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

कामगारांसाठी ‘पॉईंट टू पॉईंट’ वाहूतक व्यवस्था उभारा- उद्धव ठाकरे
SHARES

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून कोरोनाच्या (coronavirus) संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरु राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, त्याचा एक परिपूर्ण आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 

मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या उद्योगाच्या आवारात करण्याची तयारी पूर्ण करावी व ज्यांना हे करणे शक्य नाही त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार्य करून अशा उद्योगांच्या कामगारांसाठी कंपन्यांच्या समन्वयातून  उद्योगस्थळानजीक फिल्ड रेसिडन्सीयल एरिया निश्चित करण्यास सहकार्य करावे, कामगारांना त्यांच्या कामाच्या स्थळी जा- ये करण्यासाठी पॉईंट टू पॉईंट वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.  

कोणत्याही परिस्थितीत तिसरी लाट राज्यात येऊच नये यासाठी प्रयत्न करतांना दुर्देवाने तिसरी लाट आली तर राज्यातील उद्योग सुरु राहिले पाहिजेत व त्यामाध्यमातून अर्थचक्र आणि जीवनचक्र याची गती कायम राहिली पाहिले असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यावेळी म्हणाले.

आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आरोग्य विभागाचे अपरमुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, आरोग्यसंचालक रामस्वामी यांच्यासह  पोलीस महासंचालक संजय पांडे,  सीआयआयचे पश्चिम विभागाचे चेअरमन त्यागराजन, महाराष्ट्र चेअरमन सुधीर मुतालिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा- कोरोनाची तिसरी लाट रोखण्यात गर्दी मोठं आव्हान- उद्धव ठाकरे

उद्योग विभाग राज्यातील उद्योगांच्या संपर्कात – सुभाष देसाई

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्यातील उद्योग सुरु राहावेत यादृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात येत असून राज्यातील उद्योजकांशी उद्योग विभाग सातत्याने संवाद साधत असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितले. त्यांनी सीआयआय आणि राज्यातील इतर विभागीय संघटनांसमवेत बैठका झाल्या असून त्यांच्या अडीअडचणी शासन समजून घेत असल्याची माहिती दिली.  केंद्राने लसीकरणाचे डोस वाढवून द्यावेत अशी राज्याची सातत्यपूर्ण मागणी असल्याचे सांगतांना सुभाष देसाई यांनी खासगी रुग्णालयातील लस सीएसआर निधीतून विकत घेऊन कंपन्यांनी आपल्या कामगारांचे तसेच आजूबाजूच्या क्षेत्रातील नागरिकांचे लसीकरण हाती घ्यावे असे आवाहन ही त्यांनी केले.

तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहावेच लागेल – बाळासाहेब थोरात

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना अधिक वेगाने राबवाव्याच लागतील, असे प्रतिपादन महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले. त्यांनी काही जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढतांना दिसत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तिसऱ्या लाटेत उद्योग व्यवसाय सुरु राहण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी जे नियोजन सुरु केले आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करून बाळासाहेब थोरात यांनी खासगी रुग्णालयांच्या २५ टक्के कोट्यातून उद्योजकांनी आपल्या कामगारांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले. राज्यातील ऑक्सिजन निर्मिती आणि साठा वाढवण्याची गरज असून त्यादृष्टीने तयारी करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

विभागीय आयुक्तांनी यावेळी विभागात उद्योग सुरळीत सुरु राहण्यासाठी समन्वय आणि संवादातून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोरोना स्थितीचे सादरीकरण केले. राज्यात उद्योगांसाठी जो टास्कफोर्स तयार करण्यात आला आहे त्या टास्कफोर्सच्या कामाची माहिती  समन्वयक विकास खारगे यांनी यावेळी उपस्थितांना दिली. त्यांनी उद्योग जगताशी याअनुषंगाने संवाद साधल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या अडीअडचणी याची माहितीही बैठकीत दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा