Advertisement

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यात गर्दी मोठं आव्हान- उद्धव ठाकरे

केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आणावं, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यात गर्दी मोठं आव्हान- उद्धव ठाकरे
SHARES

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठं आव्हान आहे. या दृष्टीने धार्मिक, सामाजिक कारणं तसंच राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आणावं, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. 

कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने उचललेली ठोस पाऊले आणि तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या नियोजनाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ई-बैठकीत माहिती दिली. केंद्र शासनाने देशातील ६ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

रुग्ण संख्या कमी करणार

महाराष्ट्रात रुग्ण संख्या आणि मृत्यू दर कमी होत असला तरी आणखीही कमी होण्याची गरज आहे. फ्रंट लाईन वर्कर्सचं लसीकरणही वेगाने पूर्ण करीत आहोत, लसी वाया जाण्याचं प्रमाणही कमी केलं आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान कोरोना परिस्थितीत राज्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात यासाठी आभार मानून मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचं शेपूट देखील अद्याप वळवळते आहे, असे असताना  रुग्ण संख्या घटत असली तरी पूर्णपणे कमी झालेली नाही. केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर सर्वच ठिकाणी लोक घराबाहेर पडताहेत, गर्दी करताहेत रिव्हेंज टुरिझम, रिव्हेंज शॉपिंग सुरु झाले आहे. धार्मिक, राजकीय कारणांसाठी गर्दी होऊ लागली आहे. हे थांबविण्यासाठी राज्य प्रयत्न करते आहेच पण केंद्रीय पातळीवरून देखील आपल्याला काही व्यापक स्वरूपाचं धोरण आखावं लागेल.

सेंटर ऑफ एक्सलन्सची विनंती

राज्याला ज्यास्तीत जास्त लसींचे डोसेस मिळावे, महत्वाच्या औषधांच्या किमती नियंत्रित कराव्यात तसेच कोविडोत्तर उपचारांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची  केंद्रे सुरु करण्यासाठी केंद्राने मदत करावी अशी विनंती केली.

हेही वाचा- आम्ही फक्त 'त्या' व्यक्तीच्या बोलण्यालाच महत्त्व देतो, राष्ट्रवादीचा पटोलेंना टोला

उद्योगांवर परिणाम होऊ नये म्हणून 

उद्योगांसाठी कोविडविषयक टास्क फोर्स तयार केला आहे आणि मुख्यमंत्री सचिवालय त्याचे सनियंत्रण करणार आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. कामांच्या आणि भोजनाच्या वेळांची विभागणी, भोजनाच्या वेळांची सुद्धा विभागणी , सर्व कामगार-कर्मचारी यांचं लसीकरण, फिल्ड रुग्णालयांप्रमाणे कामगारांची तात्पुरती निवास व्यवस्था कंपनीच्या परिसरात करणे अशा सूचना उद्योगांना देण्यात आल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

ऑक्सिजनची गरज

मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्राने दिलेल्या प्रमाणानुसार विचार करता, संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्याला दररोज सुमारे ४ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आवश्यकता भासेल. आम्ही २ हजार मेट्रिक टन उत्पादन करू शकतो. उर्वरित २ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन नजीकच्या राज्यातून झाला तरच मोठी मदत होईल. भिलाई, जामनगर, बेल्लारी स्टील प्लांट या ठिकाणाहून एलएमओ महाराष्ट्राला मिळण्यासाठी केंद्राने सहाय्य करावे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ५३० पीएसए ऑक्सिजन प्लांट्स उभारणे सुरु असून जिल्हानिहाय ऑक्सिजन व्यवस्थापन नियोजन केल्याचंही ते म्हणाले .

जादा डोसेस मिळावेत

सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मिळून ८ ते १० जिल्ह्यांमध्ये अध्यापही संसर्ग आहे, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या जिल्ह्यांमधील १८ वर्षांपुढील २.०६ कोटी जणांना पूर्ण दोन्ही डोस देणे गरजेचे आहे. सध्या ८७.९० लाख डोसेस इथे दिल्या आहेत. त्यामुळे जादाचे ३ कोटी डोस मिळाले तर प्राधान्याने या सर्व जिल्ह्यांत संपूर्ण लसीकरण करता येईल ते म्हणाले.

औषधीच्या किंमती कमी करणं आवश्यक

मोनोक्लोनल एन्टीबॉडीज हे सध्या उपचारांमध्ये प्रभावी आहे मात्र त्याची  किंमत ५० ते ६० हजार प्रती डोस असून तिसऱ्या लाटेत  ५० हजार रुग्णांना जरी हे औषध द्यायचे म्हटले तर ३०० कोटी रुपये लागतील, याचा विचार करून केंद्र सरकारने या औषधांवर किंमतीचे निर्बंध आणावेत तसंच त्याची सहज उपलब्धता होईल हे पाहावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा