Advertisement

'त्या' महिला कैद्यांना अन्नबाधा नाहीच!

महिला कैद्यांना रूग्णालयात दाखल करण्याच्या १२ तासाआधी लेप्टो स्पायरीस प्रतिबंधित डाॅक्सी स्लाईकीन १०० एमजी हे औषधं देण्यात आलं होत. त्यानंतरच काही महिलांना उलटी-जुलाबाचा त्रास होऊ लागला.

'त्या' महिला कैद्यांना अन्नबाधा नाहीच!
SHARES

गेल्या आठवड्यात भायखळा कारागृहात अन्नबाधा झाल्यानं ८० हून अधिक महिला कैद्यांना जे. जे.रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिला कैद्यांना उपचारानंतर डिस्चार्च देण्यात आला आहे. कारागृह प्रशासनासह जे. जे. रूग्णालय प्रशासन या महिला कैद्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचं म्हणत असलं, तरी या महिला कैद्यांना अन्नातून विषबाधा झालीचं नसल्याचं अखेर समोर आलं आहे.


मग त्रास कशाने?

अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)नं शुक्रवारी घटनास्थळी धाव घेत अन्नाचे ५ नमुने घेतले होते. या नमुन्यांचा तपासणी अहवाल आला असून हे पाचही अन्नाचे नमुने सुरक्षित असल्याचं अहवालात नमूद असल्याचं शैलेश आढाव, सहआयुक्त (बृहन्मुंबई), अन्न, एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं आहे. अन्नाचे सर्व नमुने सुरक्षित आल्यानं महिला कैद्यांना अन्नबाधा झाली नसेल, तर कैद्यांना त्रास नेमका कशामुळं झाला हे आता डाॅक्टरच सांगू शकतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


दिलं होतं 'हे' औषध

महिला कैद्यांना रूग्णालयात दाखल करण्याच्या १२ तासाआधी लेप्टो स्पायरीस प्रतिबंधित डाॅक्सी स्लाईकीन १०० एमजी हे औषधं देण्यात आलं होत. त्यानंतरच काही महिलांना उलटी-जुलाबाचा त्रास होऊ लागला आणि शुक्रवारी सकाळी इतरही महिला कैद्यांनाही असा त्रास वाढला नि त्यानंतरच त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं.



औषधबाधेची शक्यता

त्यामुळं औषधबाधा झाल्याचा संशय व्यक्त करत एफडीएच्या औषध विभागानंही घटनास्थळाची तपासणी करत डाॅक्सी स्लाईकीनचे ४ नमुने ताब्यात घेतले आहे. त्यामुळं या महिला कैद्यांना औषधबाधा झाल्याची शक्यता एफडीएकडून व्यक्त करण्यात येत असल्याचं वृत्त 'मुंबई लाइव्ह'नं प्रसिद्ध केलं होतं. त्यानुसार अन्नबाधा झाली नसल्याचं आता अन्नाच्या नमुन्याच्या तपासणी अहवालातून स्पष्ट झाल्यानं ही औषधबाधा तर नाही ही शक्यता गडद झाल्याची चर्चा आहे.


अहवालाकडे लक्ष

याविषयी एफडीएच्या औषध विभागाचे सहआयुक्त (बृहन्मुंबई), औषध, एफडीए डी. आर. गहाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शुक्रवारी औषधांच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल एफडीएकडे सादर होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. या अहवालानंतरच ही औषधबाधा होती का? हे स्पष्ट होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं हा अहवालाकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर औषधबाधा झाल्याचं स्पष्ट झाल्यास हे प्रकरण गंभीर होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.



हेही वाचा-

कैद्यांच्या जीवाशी खेळ?

Exclusive: भायखळ्यातील 'त्या' कैद्यांना अन्नबाधा की औषधबाधा?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा