SHARE

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणीबाग)आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून त्याबरोरबच येथील पर्यटकांना आवश्यक त्या सूचना करण्यासाठी उद्घोषणा प्रणालीही कार्यान्वित करण्यात येणार आहे.


यावर ५.१७ कोटी रुपयांचा खर्च

राणीबागेचा कायापालट करून अत्याधुनिक पद्धतीने नुतनीकरण करत प्राणिसंग्रहालयाची उभारणी केली जात आहे. सध्या या प्राणिसंग्रहालयात प्राण्यांची संख्या कमी असली तरी पेंग्विन पक्षी हे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. त्यामुळे पर्यटकांची तसेच बच्चेमंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात डिजीटल व्हिडिओ रेकॉर्डरसहित सीसीटीव्ही आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या प्रणालीचा पुरवठा आणि पुढील पाच वर्षांची देखभाल यासाठी कॉमटेक टेलिसोल्यूशन कंपनीची निवड करून सुमारे ५.१७ कोटी रुपयांचा खर्च यावर करण्यात येणार आहे.


म्हणून सीसीटीव्ही बसवणार

राणीबाग हे मुंबईतील प्रसिद्ध प्राणिसंग्रहालयामधील असून त्याच्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. मुंबई शहर, आजुबाजुचे जिल्हे तसेच इतर राज्यातून मोठ्याप्रमाणात पर्यटक या प्राणिसंग्रहायला भेट देत असतात. त्यामुळे प्राणिसंग्रहालयात चोरी, गुन्हेगारी, अफरातफर, अपघात आणि इतर प्रकारचे गुन्हे आणि प्राणघातक हल्ले आदी प्रकारची प्रकरणे उद्भवू शकतात. त्यामुळे यासर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसोबतच लोकांना मार्गदर्शन तसेच सूचना करण्यासाठी सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती राणीबाग प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. अनिल त्रिपाटी यांनी दिली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या