Advertisement

रेल्वे स्थानकावर लिंबू पाणी पिताय, तर आधी हे वाचा...

कुर्ल्यातील एका रेल्वे स्टॉलच्या पोट माळ्यावर एक कर्मचारी अस्वच्छ पाण्यापासून लिंबू सरबत बनवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रेल्वे स्थानकावर लिंबू पाणी पिताय, तर आधी हे वाचा...
SHARES

मुंबईच्या कुर्ला रेल्वे स्थानकावरील कँटीन पुन्हा एकदा वादात सापडलं आहे. या स्टॉलच्या पोट माळ्यावर एक कर्मचारी अस्वच्छ पाण्यापासून लिंबू सरबत बनवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची दखल रेल्वे प्रशासनाने घेत या स्टॉलला टाळे ठोकलं असून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी याच स्टॉलवरील समोस्यात केस आढळल्यानं प्रवाशांनी स्टाॅलची तोडफोड केली होती.


अस्वच्छ पाण्याचा वापर

कुर्ल्याच्या प्लॅटफाॅर्म क्रमांक ७ वर असलेल्या स्टॉलवर खाद्यपदार्थाची विक्री केली जाते. या प्लॅटफाॅर्मवर हार्बर लाईनला जाणाऱ्या बहुतांश गाड्या उभ्या राहतात. त्यामुळं कायमच प्लॅटफाॅर्मवर गर्दी असते. वाढत्या तापमानामुळे तहानलेल्यांचा कल कोल्डड्रिंक्सपेक्षा नेहमीच लिंबू पाण्याकडे असतो. त्यातच २५ मार्च रोजी कँटीनच्या कर्मचाऱ्याने पोट माळ्यावरील टाकीतील धुण्या भांड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर करून लिंबू सरबत तयार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली.


ही ब्रिजवरून जात असलेल्या एका सतर्क प्रवाशाने पाहिली. त्यानंतर त्याने हा प्रकार त्याच्या मोबाइलमध्ये कैद केला. या व्हिडिओत घाणेरड्या पाण्यातून लिंबू सरबत बनवलं जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची रेल्वेच्या स्टॉलवर खाद्य पदार्थ खाण्याची इच्छा देखील होणार नाही.


स्टॉलला टाळं

ही व्हिडिओ संबंधित प्रवाशाने रेल्वे प्रशासनाला टँग करून ट्विटरवर टाकल्यानंतर काही मिनिटांत रेल्वे प्रशासनावर टीका होऊ लागली. कालांंतराने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनानं काही तासातच या स्टॉलला टाळं ठोकलं. तसंच घडलेल्या प्रकाराबाबत चौकशीचे आदेशही दिले. तसंच या ठिकाणी बनवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची एफडीएमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी दिली.


यापूर्वी स्टॉलची तोडफोड

स्टेशनवरील फलाट क्रमांक ७ वरील याच स्टॉलची २ एप्रिल २०१७ रोजी प्रवाशांनी तोडफोड केली होती. एका दिव्यांग प्रवाशानं याठिकाणाहून समोसा विकत घेतला. मात्र त्याला समोस्यामध्ये केस दिसला. हे जेव्हा त्यानं काम करणाऱ्या मुलाला सांगितलं तेव्हा त्या मुलानं त्या प्रवाशाला अपशब्द वापरले. यावेळी आजूबाजूला असलेले प्रवासी या दिव्यांगाच्या मदतीला आले आणि त्यांनी रागात स्टॉलची तोडफोड केली होती.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement