Advertisement

मास्कविना फिरणाऱ्यांवर रेल्वेची कारवाई

रेल्वेनं मास्कविना फिरणाऱ्या आणि स्थानकांवर थुंकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली

मास्कविना फिरणाऱ्यांवर रेल्वेची कारवाई
SHARES

वाढत्या कोरोनामुळं सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र तरीही अनेकजण मास्कविनाच फिरत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे. दरम्यान रेल्वेनं मास्कविना फिरणाऱ्या आणि स्थानकांवर थुंकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून गेल्या २ दिवसात पश्चिम आणि मध्य रेल्वेनं २४३ जणांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

रेल्वेस्थानकात मुख्यत: महापालिका कर्मचारी आणि जीआरपीचे पथक कारवाई करत होते. तरीही अनेकजण विनामास्क फिरताना दिसत होते. थुंकीतून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असतानाही स्थानकावरील कोपरे पाहून थुंकणाऱ्यांनी त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत. परिणामी गेल्या आठवड्यात रेल्वेनं परिपत्रक काढून रेल्वे स्थानकात थुंकणाऱ्या आणि मास्क न घातलेल्यांविरोधात कडक कारवाई करून त्यांच्याकडून ५०० रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या ४ दिवसांत मध्य रेल्वेने ११४ जणांविरोधात कारवाई केली असून त्यांच्याकडून १६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला, तर पश्चिम रेल्वेने १९ एप्रिलला ९० जणांविरोधात, तर २० एप्रिलला ९४ जणांविरोधात कारवाई करून त्यांच्यांकडून ३३ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे. दरम्यान महापालिकाही कारवाई करत असून १ फेब्रुवारी ते २० एप्रिलदरम्यान पश्चिम रेल्वेच्या स्थानकात मास्क न घातलेल्या १२ हजार ८२४ जणांविरोधात कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २१ लाख ५३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

यामध्ये फेब्रुवारीत ४०१७, मार्चमध्ये ६९७२ आणि एप्रिल महिन्यात २० तारखेपर्यंत १८३५ जणांविरोधात कारवाई केली आहे. त्यांच्याकडून अनुक्रमे ६ लाख २९ हजार, १० लाख ९३ हजार आणि ४ लाख ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा