Advertisement

मुंबईत ‘एक्सई’बाधित रुग्णासंदर्भात पुरावा नाही, पालिकेचा दावा केंद्रानं फेटाळला

अधिक तपासासाठी त्याचे जनुकीय चाचण्यांचे अहवाल पाठविण्याचे आदेश कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेला दिले.

मुंबईत ‘एक्सई’बाधित रुग्णासंदर्भात पुरावा नाही, पालिकेचा दावा केंद्रानं फेटाळला
(Representational Image)
SHARES

मुंबईत करोनाच्या ‘एक्सई’ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण आढळल्याचे राज्याच्या आरोग्य विभागानं बुधवारी जाहीर केलं. पण हा दावा केंद्रानं फेटाळून लावला आहे. अधिक तपासासाठी त्याचे जनुकीय चाचण्यांचे अहवाल पाठविण्याचे आदेश कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेला दिले.

जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्यांचा अभ्यास करणारी इंडियन सार्स-सीओव्ही२ जिनोमिक्स कन्सॉर्रिटयम (आयएनएसएसीओजी) या संस्थेतील तज्ज्ञांच्या मते या रुग्णाचे जिनोम चाचणीचा अहवाल एक्सईच्या जिनोमनुसार नाहीत. त्यामुळे या रुग्णाला एक्सई या उपप्रकाराची बाधा झाली आहे, असे म्हणता येणार नाही.

‘आयएनएसएसीओजी’ची संध्याकाळी बैठक झाली असून, यामध्ये कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री सहभागी झाल्या होत्या. कस्तुरबा प्रयोगशाळेतील अहवालांचे विश्लेषण करण्यासाठी नमुने पुन्हा पाठवण्याची मागणी या बैठकीत केली आहे.

मुंबईतील २३० रुग्णांच्या जनुकीय चाचण्यांचा अहवाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यात २३० पैकी २२८ म्हणजेच ९९ टक्के रुग्णांना ओमायक्रॉनची तर दोन रुग्णांना ‘एक्सई’ आणि ‘कप्पा’ या करोना विषाणूच्या उपप्रकारांची बाधा झाल्याचं मुंबई पालिकेनं अहवालात जाहीर केलं.

मुंबईत ५० वर्षीय महिलेला ‘एक्सई’ची बाधा झाल्याचे प्राथमिक चाचण्यांमध्ये आढळलं आहे. ही महिला दक्षिण आफ्रिकेची नागरिक आहे. चित्रिकरणासाठी १० फेब्रुवारीला ती भारतात आली होती. त्यावेळी तिला कोरोनाची बाधा झालेली नव्हती.

परंतु, चित्रीकरणादरम्यान नियमितपणे केल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये २ मार्चला ती बाधित आढळली. तिचे नमुने चाचणीसाठी पाठविले असता तिला ‘एक्सई’ची बाधा झाल्याचे आढळले. ३ मार्चला दिलेल्या नमुन्यामध्ये ही महिला करोनामुक्त झाल्याचेही आढळले. या महिलेने लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या होत्या़ तिला कोणतीही लक्षणे नव्हती़

‘एक्सई’ म्हणजे काय?

एक्सई हा कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या प्रकाराचाही उपप्रकार आहे. ओमायक्रॉनच्या बीए.१ आणि बीए.२ या उपप्रकारांचे उत्परिवर्तन होऊन एक्सई हा विषाणू निर्माण झाला आहे. यामध्ये बीए.१ आणि बीए.२ जनुकीय घटकांचे मिश्रण झाल्याचे आढळले आहे.

ब्रिटनमध्ये एक्सई हा विषाणूचा उपप्रकार १९ जानेवारी २०२२ रोजी आढळला होता. जगभरात या विषाणूचे सहाशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आत्तापर्यत आढळलेल्या करोना विषाणूच्या प्रकारामध्ये हा सर्वाधिक वेगाने पसरणारा आहे. परंतु याबाबत अद्याप पुरेशी माहिती नाही.



हेही वाचा

चिंतादायक! मुंबईत आढळले कोरोनाच्या २ नव्या व्हेरिएंटचे रुग्ण

चीनमध्ये कोरोनाचा वेग वाढतोय, पालिका पुन्हा अलर्टवर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा