Advertisement

एआयओसीडीचा बंद अयशस्वी - गिरीष बापट


एआयओसीडीचा बंद अयशस्वी - गिरीष बापट
SHARES

ई-पोर्टलच्याविरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एआयओसीडी) ने पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून, बंद अयशस्वी ठरल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या बंदमध्ये मुंबईसह राज्यातील हजारो औषध विक्रेते सहभागी झाले नाहीत. त्यामुळे सकाळपासूनच राज्यभर मोठ्या संख्येने औषध दुकाने खुली होती आणि दुपारी पाचनंतर यात आणखी वाढ होईल, असेही बापट यांनी स्पष्ट केले आहे. तर ई-पोर्टल हे औषध उत्पादन-खरेदी-विक्रीवर अंकुश आणणार असून, त्याचा फायदा सर्वांनाच होणार असल्याने औषध विक्रेत्यांनी या ई-पोर्टलला समर्थन द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

रात्री 12 वाजल्यापासून सुरू झालेल्या एकदिवसीय बंदमुळे रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी सरकार आणि एफडीएकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी रूग्णालयातील औषध दुकाने खुली ठेवण्यात आल्याचेही बापट यांनी यावेळी सांगितले. ई-पोर्टलसंबंधी केंद्र सरकारने सुचना-हरकती मागवल्या असून, या ई-पोर्टलमुळे औषध व्यवसायात पारदर्शकता येणार असल्याने केंद्राचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही बापट यांनी स्पष्ट केले. तर औषध विक्रेत्यांच्या मनात या ई-पोर्टलसंबंधी काही शंका वा समस्या असतील तर नक्कीच केंद्राशी औषध विक्रेत्यांसोबत चर्चा करू असे आश्वासन देत बंद मागे घेण्याचे आवाहनही बापट यांनी केले.

बंद यशस्वीच- एआयओसीडी

बंदला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने बंदचा फज्जा उडाल्याचे म्हटले जात असून, बापट यांनीही बंद अयशस्वी ठरल्याचे म्हटले आहे. मात्र यानंतरही एआयओसीडी मात्र बंद 100 टक्के यशस्वी ठरल्याचे सांगत आहे. तर मंत्र्यांनी कुठे आणि किती दुकाने खुली होती, याची जिल्हानिहाय आकडेवारी जाहीर करत बंद अयशस्वी ठरल्याचे सिद्ध करावे, अशा शब्दात महाराष्ट्र केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसीएशनच्या अनिल नावंदर यांनी बापट यांना आव्हान दिले आहे.


हेही वाचा - 

औषध विक्रेत्यांच्या बंदला मुंबईत अल्प प्रतिसादसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा