स्वच्छतादूतांनाही दंड वसूल करण्याचा मिळणार अधिकार?

  Dongri
  स्वच्छतादूतांनाही दंड वसूल करण्याचा मिळणार अधिकार?
  मुंबई  -  

  पालिकेच्या बी विभागामध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत 5 जूनपासून 'क्लिन अप मार्शल'ची जागा पालिकेच्या स्वच्छतादूतांनी घेतली आहे. या स्वच्छतादूतांनाही 'क्लिनअप मार्शल'प्रमाणे नागरिकांनी अस्वच्छता केल्यास दंड वसूल करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी बी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी पालिका मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. तो प्रस्ताव विचाराधीन असून, त्याला मंजूरी मिळाल्यास स्वच्छतादूतांनाही अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांकडून क्लिनअप मार्शलप्रमाणे दंड वसूल करण्याचा अधिकार मिळणार आहे.


  हेही वाचा - 

  बी पालिका विभागात 'क्लिन अप मार्शल'ची जागा घेणार स्वच्छतादूत


  पालिकेच्या बी विभागात डोंगरी, उमरखाडी आदी संवेदनशील विभाग असल्यामुळे या भागात पालिकेने नेमलेले 'क्लिन अप मार्शल' काम करायला धजावत नाहीत. त्यामुळे या भागात अद्याप 'क्लिन अप मार्शल' रुजू झालेले नाहीत. त्यामुळे घाण केल्यास दंडाची शिक्षा करायला कोणी नसल्यामुळे या परिसरात दुर्गंधी करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. या परिसरात अस्वच्छता फैलावणारे मोकाट वावरत आहेत. या सर्वांना आळा बसावा आणि स्वच्छतेची जाणीव येथील नागरिकांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी बी पालिका विभागाचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी 'क्लिन अप मार्शल'च्या जागी पालिकेच्या 3 कर्मचाऱ्यांची स्वच्छतादूत म्हणून नेमणूक केली आहे. हे स्वच्छतादूत बी पालिका विभागातील जागोजागी, गल्लीबोळात फिरून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करत आहेत. मात्र हे स्वच्छतादूत असल्यामुळे अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याचा त्यांना अधिकार नाही.

  बी पालिका विभागाचे स्वच्छतादूत आपले दैनंदिन काम करून ही भूमिका निभावत असल्यामुळे त्यांनाही अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याचा अधिकार देण्यात यावा. तसेच क्लिनअप मार्शलप्रमाणे त्यांनाही दंडातून काही रक्कम मोबदला म्हणून मिळावी आणि त्यांना सहज गल्लीबोळातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी 25 सायकल खरेदी करण्यास परवानगी मिळावी, यासाठी पालिका मुख्यालयाकडे बी पालिका विभागाने प्रस्ताव पाठवला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.