Advertisement

बी पालिका विभागात 'क्लिन अप मार्शल'ची जागा घेणार स्वच्छतादूत


बी पालिका विभागात 'क्लिन अप मार्शल'ची जागा घेणार स्वच्छतादूत
SHARES

रस्त्यावरून चालताना सर्वत्र पसरलेली घाण, जागोजागी बांधलेल्या शेळ्या, मेंढ्या, कानाकोपऱ्यात पानांच्या पिचकाऱ्या त्यामुळे पसरलेली दुर्गंधी अशी काहीशी स्थिती पहायला मिळते पालिकेच्या बी विभागामध्ये. ही स्थिती सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेच्या बी पालिका विभागामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत येत्या 5 जूनपासून 'क्लिन अप मार्शल'ची जागा पालिकेचे स्वच्छतादूत घेणार आहेत.

पालिकेच्या बी विभागात डोंगरी, उमरखाडी आदी असंवेदनशील भाग असल्यामुळे या भागात पालिकेने नेमलेले 'क्लिन अप मार्शल' काम करायला धजावत नाही. त्यामुळे या भागात अद्याप 'क्लिनअप मार्श'ल रुजू झाले नाही. त्यामुळे घाण केल्यास दंडाची शिक्षा करायला कुणी नसल्यामुळे या परिसरात दुर्गंधी करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. या परिसरात अस्वच्छता पसरवणारे मोकाट वावरत आहेत. या सर्वांना आळा बसावा आणि स्वच्छतेची जाणीव येथील नागरिकांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी बी पालिका विभागाचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी नामी शक्कल लढवली आहे. 'क्लिन अप मार्शल'च्या जागी त्यांनी पालिकेचे कर्मचारी, कनिष्ठ अभियंता, कंत्राटदार यांना स्वच्छतादूत म्हणून परिसरात नेमले आहे.

लवकरच हे स्वच्छतादूत बी पालिका विभागातील जागोजागी, गल्ली बोळ्यात फिरताना दिसतील. या स्वच्छतादूतांना विशेष असा सफेद रंगाचा गणवेश देण्यात येणार असून, त्यावर पालिकेचा लोगो आणि स्वच्छतादूत म्हणून लिहिलेले असणार आहे. हे स्वच्छतादूत नागरिकांकडून दंड वसूल न करता नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करणार आहेत. विशेष म्हणजे हे स्वच्छतादूत त्यासाठी वेगळा वेळ न देता त्यांचे काम करतानाच स्वच्छतादूताची भूमिका निभावणार आहेत. सध्या हा प्रस्ताव बी पालिका विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी पालिका मुख्यालयातून मंजूर करून घेतला आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत येत्या 5 जूनपासून बी पालिका विभागामध्ये स्वच्छतादूत आपले काम करण्यास सुरुवात करतील.

लोकांनी अस्वच्छता केल्यास त्यांच्याकडून बळजबरीने दंड वसूल करणे, दमदाटी करणे योग्य नाही. तर त्यांच्यामध्ये स्वच्छते विषयी भावना आणि जनजागृती करणे आवश्यक आहे. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वच्छतादूत ही संकल्पना राबवत असल्याचे बी पालिका विभागाचे सहायक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा