Advertisement

सेंट जॉर्जमध्ये सफाई कर्मचाऱ्याचा हृद्यविकाराने मृत्यू, सफाई कर्मचाऱ्यांनी केला निषेध


सेंट जॉर्जमध्ये सफाई कर्मचाऱ्याचा हृद्यविकाराने मृत्यू, सफाई कर्मचाऱ्यांनी केला निषेध
SHARES

मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात एका सफाई कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. कर्मचाऱ्याची प्रकृती इतकी बिकट असतानाही या कर्मचाऱ्याची काळजी घेण्यात आली नाही. शिवाय त्यावेळी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित नसल्याने रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी रुग्णालय प्रशासनाविरुद्ध तीव्र निदर्शने केली.

पण, रुग्णालयात असा कुठलाही प्रकार घडला नसून यासंदर्भात सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सांगत रुग्णालय प्रशासनाने या प्रकारावर पडदा टाकण्याचे काम केले आहे.

विश्वनाथ मोरे (38) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव असून ते मालाड येथील एका चाळीत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि आई असा परिवार आहे. गेली 15 वर्षे मोरे सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते.

शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर आल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. प्रकृती ठिक वाटत नसल्याने त्यांनी रुग्णालयातील बाहृयरुग्ण विभागात वैद्यकीय तपासणी केली. रुग्णालयात उपस्थित निवासी डॉक्टरने ईसीजी केल्यानंतर हृदयाच्या ठोक्यात फरक दिसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, प्रकृती बिकट असून जीवावर बेतू शकते, याची कल्पना त्यांना देण्यात आली नाही.


सर्वसाधारण वॉर्डमध्ये ठेवले

इतकेच नाहीतर अतिदक्षता विभाग (आयसीयू) मध्ये खाटा रिकाम्या असताना मोरे यांना सर्वसाधारण वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. अचानक बोलत-चालत असतानाच मोरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यामुळे जागीच कोसळून त्यांचा मृत्यू झाला.

हा सर्व प्रकार घडला त्यावेळी रुग्णालयात एकही तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित नव्हते. मोरे यांच्या प्रकृतीची तपासणी वेळेवर करून उपचार सुरू न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.


सफाई कर्मचाऱ्याचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे चुकीचे आहे. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या बाहेर निदर्शन केली. या घटनेची सखोल चौकशी करण्याकरीता स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती संपूर्ण घटनेचा तपास करून अहवाल सादर करेल. त्यानुसार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधिक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय


सफाई कर्मचाऱ्यांची 80 पदे रिक्त

या रुग्णालयात सध्या चतुर्थ श्रेणी वर्गातील 425 सफाई कर्मचारी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. तर 80 कर्मचाऱ्यांची पदे अद्यापही रिक्तच आहेत. ही पदे भरण्यासाठी अजून कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. याबाबत वारंवार प्रशासनाकडे विचारणा करण्यात आली. तरीही पदे भरण्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.


मोरे यांचा मृत्यू कामाच्या तणावामुळेच झाला आहे. कर्मचारी म्हणून रुग्णालयात त्यांच्यावर उत्तम प्रकारे उपचार व्हायला हवे होते. पण तसे न झाल्याने मोरे यांचा मृत्यू झाला. या निषेधार्थ सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात उतरून रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात निषेध नोंदवला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी या आंदोलनाची दखल घेत संबध प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
- लीला लाड, महिला अध्यक्षा, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना



हे देखील वाचा -

भाभा रुग्णालय कात टाकणार!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा